यंदा वारी चुकल्याने खंतावले वारकरी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2020 05:00 PM2020-07-01T17:00:22+5:302020-07-01T17:08:01+5:30

नाशिक : कोरोनामुळे यंदा पंढरपूरची आषाढी वारी आम्हाला करता आली नाही. त्यामुळे लाडक्या विठूरायाचे दर्शन देखील घेता आले नाही. अशी खंत शहर व उपनगरांमधील वारकऱ्यांनी व्यक्त केली. तसेच आषाढीनिमित्त घरच्या घरी भजन करीत विठ्ठलनामाचा जप सर्वांनी केला. विठुरायाच्या दर्शनासाठी आतुरलेले वारकरी दरवर्षी राज्याच्या कानाकोपºयातून पायी दिंंडीने पंढरपुरला जात असतात. यंदा कोरोना संसर्ग टाळण्यासाठी धार्मिक कार्यक्रम आणि उत्सवांवर मर्यादा असल्याने वारी होऊ शकली नाही. मानाच्या पालख्या देखील बसने पंढरपुरला गेल्या. अनेक वर्षे न चुकता वारी करणारे वारकरी यामुळे खंतावले आहेत.

This time, Warakari is tired of missing Wari! | यंदा वारी चुकल्याने खंतावले वारकरी!

यंदा वारी चुकल्याने खंतावले वारकरी!

googlenewsNext
ठळक मुद्देवारकऱ्यांनी व्यक्त केली खंतघरीच केला विठुनामाचा गजर

नाशिक : कोरोनामुळे यंदा पंढरपूरची आषाढी वारी आम्हाला करता आली नाही. त्यामुळे लाडक्या विठूरायाचे दर्शन देखील घेता आले नाही. अशी खंत शहर व उपनगरांमधील वारकऱ्यांनी व्यक्त केली. तसेच आषाढीनिमित्त घरच्या घरी भजन करीत विठ्ठलनामाचा जप सर्वांनी केला.
विठुरायाच्या दर्शनासाठी आतुरलेले वारकरी दरवर्षी राज्याच्या कानाकोप-यातून पायी दिंंडीने पंढरपुरला जात असतात. यंदा कोरोना संसर्ग टाळण्यासाठी धार्मिक कार्यक्रम आणि उत्सवांवर मर्यादा असल्याने वारी होऊ शकली नाही. मानाच्या पालख्या देखील बसने पंढरपुरला गेल्या. अनेक वर्षे न चुकता वारी करणारे वारकरी यामुळे खंतावले आहेत.

दिंडी सोहळ्यात सहभागी होण्यासाठी वारकरी तळमळत असतात तो सोहळा कोरोना मुळे दुरावला आहे. परंतु आलेल्या संकटाने खचून न जाता.नवीन जोमाने वारीत होणारे सर्व काकडा, हरीपाठ, किर्तन, भजन आदि कार्यक्र म याचा लाभ घरात व गावात सरकारने घालून दिलेल्या नियमांचे पालन करून साजरा करु या.
-भिमाशंकर राऊत, प्रदेश कमिटी सदस्य , अ.भा. वारकरी मंडळ

‘पंढरीची वारी आहे माझे घरी! आणिक न करी तीर्थव्रत!’ यंदा कोरोना संकटामुळे पंढरपूर वारी अंतरली, याच मनस्वी दु:ख होते. पायी वारीचे फार फायदे आहेत, या सुखाला आपण मुकलो. याबद्दल मनात हुरहुर वाटते. आमची देवाला एकच विनंती आहे हे कोरोना महामारीच दु:ख लवकर संपव आणि आम्हाला तुझ्या पायाजवळ लवकर बोलव.
- सुभाष महाराज जाधव,
विभागीय सदस्य, अ. भा. वारकरी मंडळ, नाशिक

पाऊले चालती पंढरीची वाट म्हणत आम्ही गेल्या एक तपापासून वारी करत आहोत . वयाच्या पन्नाशीत देखील मागील वर्षाची वारी देखील आम्ही अतिशय उत्साहात आणि आनंदात पांडुरंगाच्या नामघोषात झाली होती, परंतु यावर्षी कोरोनाच्या संकटामुळे पायी वारी खंडित झाली आहे. त्यामुळे यंदा घरी राहून विठुरायाचे नामस्मरण करून या वर्षाची वारी साजरी करत आहोत.
- संजय आव्हाड, नाशिकरोड

गेली १७ वर्षापासून दरवर्षी खंड न पडता आषाढी एकादशीला पंढरपूरच्या वारीला सहका-यांसह पायी जातो. मात्र या वर्षी कोरोनाचा भयंकर संसर्ग व महाभयंकर संकटामुळे वारी मध्ये जाता येत नाही. आपली वारी चुकेल असे कधीही वाटले नव्हते. मात्र कोरोनामुळे सर्वत्र लॉकडाऊनची परिस्थिती निर्माण झाल्याने या वर्षी वारीत खंड पडल्याने मन विषन्न झाले आहे.
-मुकुंदा टिळे, बाभळेश्वर, ता.जि.नाशिक

गेली बारा वर्षापासून दरवर्षी खंड न पडू देता आषाढी एकादशीला पंढरपूरच्या वारीला पायी जाण्याचे व्रत होते,त्यात कोरोनाच्या महाभयंकर संकटामुळे खंड पडला आहे. इच्छा असूनही जाता येत नाही. आयुष्यात पहिल्यांदा पंढरपूरची वारीला खंड पडतोय म्हणून मी बेचैन आहे.
-लक्ष्मण खंडेराव पाटील म्हस्के- वारकरी,
कोटमगाव, ता.जि.नाशिक,

पांडुरंग दर्शनाच्या आनंदाला आज कोरोना संकटामुळे आम्ही यंदा मुकलो आहोत. समाजाचे हित लक्षात घेता घरीच वारी साजरी करण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. आजपर्यंत आम्ही पंढरीला गेलो आज पंढरीनाथ आमच्या घरी येणार आहे. घरातील वारीतच तो आम्हाला दर्शन देणार आहे.
- दत्तात्रेय पाटील डुकरे, सारोळा

यंदा जरी वारी चुकली तरी पांडुरंग घरीच येणार असून, भक्तांनी घरीच ‘हरी मुखे ’म्हणावे कोरोनापासून दूर जाऊ दे, अशी प्रार्थना करावी.
- रामचंद्र शिंदे, गंगावाडी

सुमारे तीस वर्षांपासून मी पायी दिंडी सोहळ्यात सहभागी होत असून यंदा दिंडी निघणार नसल्याने खूप उदास वाटते. परंतु घरीच हरीनाम जप सुरू आहे . सध्या माझे वय ८० वर्ष असून मेरी संस्थेतून सेवानिवृत्त झाल्यापासून सतत धार्मिक कार्यात सहभागी होत आहे. वारीची परंपरा खंडीत झाली तरी पुढच्या वर्षापासून पुन्हा अखंड सुरू राहावी , हीच अपेक्षा
- रघुनाथ सोनांबेकर, द्वारका,
अध्यक्ष संत नरहरी महाराज पायी दिंडी सोहळा

गेली पंधरा वर्षापासून आषाढी एकादशीला त्र्यंबकेश्वर येथून निवृत्तीनाथ महाराज महाराज यांच्या समाधीचे दर्शन घेऊन त्यांच्या रथा बरोबर पंढरपूर पर्यंत न चुकता एकही वर्ष खंड न पडता मी पांडुरंगाची वारी केली. .कोरोनाच्या साथीमुळे यंदा पंढरपूरला विठुमाऊलीच्या दर्शनासाठी जाता येत नसल्याने मन बेचैन झाले आहे. परत असे संकट देशावर येऊ नये हि विठ्ठलाच्या चरणी प्रार्थना.
- प्रभाकर गोसावी, वारकरी, कोटमगाव, ता.जि.नाशिक


माझे वय ७३ आहे. गेल्या २० वर्षांपासून न चुकता आषाढी वारीत पायी पंढरपूरला जातो. सुरु वातीला पाच वर्षे आळंदीहून वारी केली. कोरोनाच्या महाभयंकर संकटामुळे वारीला बंदी घातली आहे. तरीही बसने जाण्याचा विचार मनात आला.मात्र बससेवाही बंद आहे. यंदा घरी राहुनच जगावरील कोरोना संकट लवकर निवळु देण्यासाठी ते पांडुरंगाला साकडे घालत आहे.
-पांडुरंग धात्रक, हिंगणवेढे, ता.जि.नाशिक.

आपल्याला पंढरीरायाचे दर्शन होणार नाही, संतांच्या संगतीत आपल्याला पंढरीला जाता येणार नाही, ही भावना प्रत्येक वारक-यांच्या मनात आहे, ख-या अर्थाने वारकरी हा शब्द मुळात वारीकर असा आहे, यावर्षी या वारक-याला मानसिक वारी करून समाधान मानावं लागणार आहे. प्रत्येकाची मानसिक वारी होत आहे. परमात्मा पंढरीरायाने ही महामारी लवकर संपवून आपल्या भक्तांना वारक-यांना भेटावं एवढीच अपेक्षा.
- चैतन्य महाराज निंबोळे, नाशिक

Web Title: This time, Warakari is tired of missing Wari!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.