निर्यातीत फसवणूक टाळण्यासाठी नाशिकच्या शेतक-यांना टिप्स
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2018 02:24 PM2018-02-23T14:24:18+5:302018-02-23T14:26:42+5:30
गेल्या तीन दिवसांपासुन सुरू असलेल्या या महोत्सवात सेंद्रीय उत्पादनांना ग्राहकांनी अधिकाधिक पसंती दिली. कृषी महोत्सवात भरविण्यात आलेल्या संमेलनाच्या माध्यमातून उत्पादक शेतकरी, निर्यातदार आणि खरेदीदार संस्थेचे प्रतिनिधी यांची एकाच ठिकाणी चर्चा घडवून आणण्यात आली.
नाशिक : द्राक्ष, कांदा व डाळींबाचे दरवर्षी मोठ्या प्रमाणात परदेशात निर्यात करणा-या जिल्ह्यातील शेतक-यांनी निर्यातीच्या माध्यमातून होणारी फसवणूक टाळण्यासाठी जिल्हा कृषी महोत्सवात या क्षेत्रातील जाणकारांनी शेतक-यांना विविध प्रकारच्या टिप्स दिल्या. त्यात प्रामुख्याने शेतक-यांनी निर्यातदाराची आर्थिक बाजू लक्षात घेण्याबरोबरच गतवर्षीच्या आयात व निर्यातची आकडेवारी तपासून माल देण्याची सुचना यावेळी करण्यात आली. गेल्या तीन दिवसांपासुन सुरू असलेल्या या महोत्सवात सेंद्रीय उत्पादनांना ग्राहकांनी अधिकाधिक पसंती दिली.
कृषी महोत्सवात भरविण्यात आलेल्या संमेलनाच्या माध्यमातून उत्पादक शेतकरी, निर्यातदार आणि खरेदीदार संस्थेचे प्रतिनिधी यांची एकाच ठिकाणी चर्चा घडवून आणण्यात आली. विविध उद्योग समुह,निर्यातदार, परदेशी कंपन्या असे २५ खरेदीदार यावेळी उपस्थित होते. या प्रसंगी विविध उत्पादनांबाबत असलेल्या अपेक्षा आणि उत्पादनाची गुणवत्ता यावर निर्यातदारांनी सखोल माहिती दिली. आर्थिक व्यवसायात पारदर्शकता यावी म्हणून करार पद्धतीचा अवलंब केल्यास शेतक-यांची फसवणूक टळेल असा सल्लाही देण्यात आला. यावेळी द्राक्ष, कांदा, डाळींब, टोमॅटो, मिरची, पॅकेजिंग विषयाशी संबंधित शेतकरी आणि खरेदीदार यांची समोरासमोर चर्चा ठेवण्यात आली. आत्माचे प्रकल्प संचालक अशोक कांबळे यांनी शेतक-यांनी व्यवस्थितरित्या खरेदीदाराची माहिती घेऊन मालाची विक्री करताना कायदेशीर करार करावा असे सांगितले. खरेदीदारांनी शेतक-यांच्या मालाला चांगला दर मिलावा यासाठी शेतक-यांना सहकार्य करावे आहे आवाहनही त्यांनी केले. गेल्या वर्षी त्र्यंबकेश्वर, पेठ आणि सुरगाणा या भागातून एक हजार मेट्रीक टन आंब्याचे संकलन करण्यात आले होते अशी माहिती त्यांनी उपस्थितांना दिली.