नाशिकमध्ये तिरडी मोर्चा, बंदोबस्तात वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2022 01:49 AM2022-06-27T01:49:05+5:302022-06-27T01:49:31+5:30
शिवसेनेतून फुटलेले आमदार एकनाथ शिंदे, दादा भुसे आणि सुहास कांदे यांच्या निषेधार्थ आक्रमक भूमिका घेत नाशिक शहरात शिवसेनेच्या वतीने रविवारी (दि.२६) संबंधितांचा तिरडी मोर्चा काढण्यात आला. त्यानंतर अमरधाममध्ये प्रतीकात्मक शोक सभा घेतानाच गद्दारांना धडा शिकवण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.
नाशिक : शिवसेनेतून फुटलेले आमदार एकनाथ शिंदे, दादा भुसे आणि सुहास कांदे यांच्या निषेधार्थ आक्रमक भूमिका घेत नाशिक शहरात शिवसेनेच्या वतीने रविवारी (दि.२६) संबंधितांचा तिरडी मोर्चा काढण्यात आला. त्यानंतर अमरधाममध्ये प्रतीकात्मक शोक सभा घेतानाच गद्दारांना धडा शिकवण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. नाशिक शहरातील शालिमार येथील मध्यवर्ती शिवसेना कार्यालय येथून हा मोर्चा काढण्यात आला. तीन तिरड्या तयार करून त्यावर संबंधित आमदारांच्या प्रतिमा लावण्यात आल्या हाेत्या. त्यानंतर निषेधाच्या घोषणा देत मोर्चा नाशिक अमरधामच्या प्रवेशद्वारासमोर गेल्यानंतर प्रतीकात्मक अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना समर्थन देतानाच गद्दारांची गय केली जाणार नाही, असा इशारा देणारी भाषणे नेत्यांनी केली.
दरम्यान, नाशिकमध्ये आमदार सुहास कांदे यांच्या शरणपूर कार्यालयाबाहेर, तसेच भाजप आणि शिवसेना कार्यालयाबाहेर मेाठ्या प्रमाणात पाेलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे, तसेच शहरातील विविध भागांतून पोलिसांनी संचलन केले.