धक्कादायक! सावकाराच्या जाचाला कंटाळून तरुणाने घेतला गळफास
By ऑनलाइन लोकमत | Published: January 19, 2022 02:40 PM2022-01-19T14:40:09+5:302022-01-19T14:42:16+5:30
सातपूर गावात राहणाऱ्या नीलेश याने संशयित सावकार निखिल भावले यांच्याकडून चार महिन्यापूर्वी दहा हजार रुपये व्याजाने घेतले होते. त्याबदल्यात ...
सातपूर गावात राहणाऱ्या नीलेश याने संशयित सावकार निखिल भावले यांच्याकडून चार महिन्यापूर्वी दहा हजार रुपये व्याजाने घेतले होते. त्याबदल्यात तो त्यांना दरमहा व्याजरुपी रक्कम देत होता.पैसे परत करावेत म्हणून संशयित भावले वारंवार त्रास देत होता. सोमवारी (दि.१७) संशयित निखिल हा नीलेशच्या घरी गेला. त्यावेळी त्यांच्यात वाद झाला. भावले याने नीलेशची मोपेड दुचाकी बळजबरीने उचलून नेली. नीलेश हा नैराश्याच्या गर्तेत बुडाला आणि अखेर कर्जाच्या परतफेडीपोटी होणाऱ्या सावकारी छळाला कंटाळून त्याने गळफास लावून आत्महत्या केल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. मयत नीलेशचा भाऊ आकाश सोनवणे याने सातपूर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरुन पोलिसांनी संशयित निखिल भावले या खाजगी सावकाराच्या विरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.
खाजगी सावकारीतून बेकायदा कर्ज देऊन कर्ज वसुलीसाठी तगादा लावला जात असल्याचे समोर आले आहे. यातूनच सातपूर येथील अशोकनगर भागात राहणाऱ्या नीलेशने आपलं जीवन संपविल्याचे स्पष्ट झाले आहे.
दरमहा देत होता अडीच हजार व्याज
मयत नीलेश सोनवणे याने संशयित सावकार निखिल भावले यांच्याकडून दहा हजार रुपयांचे कर्ज २५ टक्के व्याजदराने घेतले होते. त्यामुळे तो भावले यांना अडीच हजार रुपयांचे व्याज भरत होता, असे पोलिासंनी सांगितले. त्याच्याकडे एका महिन्याचे व्याज थकले होते म्हणून भावले याने नीलेशची दुचाकी ओढून नेल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. त्यामुळे नीलेशने टोकाचे पाऊल उचलून आपले जीवन संपविले. या धक्कादायक घटनेने सातपूर परिसरात हळहळ व खासगी बेकायदेशीर सावकारीविरुद्ध संताप व्यक्त केला जात आहे.
पोलीस आयुक्तांच्या भूमिकेकडे लक्ष
शहरात अवैधरीत्या चालणाऱ्या खासगी सावकारी पेढ्या पोलीस प्रशासन कधी उद्ध्वस्त करणार याकडे आता नागरिकांचे लक्ष लागले आहे. भूमाफियांची पाळेमुळे उखडून फेकणारे दीपक पाण्डेय खासगी सावकाराविरुद्ध काय भूमिका घेणार याकडे आता लक्ष लागले आहे.