रेशनच्या धान्यावर तूरडाळीची सक्ती
By admin | Published: September 1, 2016 12:47 AM2016-09-01T00:47:51+5:302016-09-01T00:47:51+5:30
नवा फंडा : ...तरच धान्याची उचल
नाशिक : शिधापत्रिकाधारकांना दुय्यम दर्जाची महाग तूरडाळ रेशनवरून देण्यास नकार देणाऱ्या रेशनदुकानदारांना वठणीवर आणण्यासाठी पुरवठा खात्याने नवीन फंडा शोधून काढला असून, सप्टेंबर महिन्यासाठी धान्याबरोबर तूरडाळीची विक्री करण्याची अप्रत्यक्ष सक्ती करण्याचे ठरविले आहे, त्यासाठी धान्य उचलीचे चलनच मंजूर न करण्याच्या सूचनाही पुरवठा अव्वल कारकूनांना देण्यात आल्या आहेत.
खुल्या बाजारात तूरडाळीचे भाव वाढल्यामुळे गोरगरीब शिधापत्रिकाधारकांना स्वस्त दरात रेशनमधून तूरडाळ उपलब्ध करून देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेऊन त्यासाठी खासगी पुरवठादारांकडून निविदा मागवित तूरडाळ पुरविण्याचा ठेका दिला. प्रती शिधापत्रिकाधारकाला १०३ रुपये किलोप्रमाणे एक किलो या प्रमाणात तूरडाळ वितरित करण्याचे ठरलेले असताना, जिल्ह्यासाठी पावणेपाच हजार क्विंटल तूरडाळ दाखलही झाली, परंतु रेशनवर तूरडाळ उपलब्ध होताच, खुल्या बाजारातील तूरडाळीचे दर कमालीचे कमी झाले, त्याचबरोबर रेशनवरील तूरडाळ दुय्यम दर्जाची असल्याची तक्रार करीत रेशन दुकानदारांनी ती उचलण्यास नकार दिला. त्यामुळे गेल्या दहा दिवसांपासून तूरडाळीच्या एका कणाचीही विक्री होेऊ शकलेली नाही, उलट शासनाकडून याबाबत तगादा सुरू झाल्याने पुरवठा खाते अडचणीत सापडले. शासनाने तूरडाळीसाठी कोट्यवधी रुपये खर्च केलेले असताना त्यातून एक रुपयाचीही कमाई होत नसल्याचे पाहून सप्टेंबर महिन्यात शिधापत्रिकाधारकांसाठी वाटप केल्या जाणाऱ्या अन्नधान्याबरोबर तूरडाळही माथी मारण्याचा निर्णय पुरवठा खात्याने घेतला आहे. त्यासाठी रेशन दुकानदारांकडून अन्नधान्य उचलण्यासाठी भरले जाणारे चलन मंजूर न करण्याचे ठरविण्यात आले आहे. जो रेशन दुकानदार तूरडाळ विक्रीसाठी घेईल त्याचेच धान्याचे चलन मंजूर करण्यात येणार आहे. याचाच अर्थ शिधापत्रिकाधारकांनाही तूरडाळ खरेदीची सक्ती करण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)