तीर्थराज कुशावर्त बंदिस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2020 09:49 PM2020-04-02T21:49:23+5:302020-04-02T21:50:14+5:30
तीर्थक्षेत्रातील सर्व दर्शनीय व धार्मिक स्थळे भाविकांसाठी बंद करण्यात आल्याने तसेच लॉकडाउनमुळे शहराच्या सीमादेखील बंद करण्यात आल्याने गावात फक्त अत्यावश्यक सेवेसाठी बाहेर पडणारेच लोक दिसून येत आहे.
त्र्यंबकेश्वर : तीर्थक्षेत्रातील सर्व दर्शनीय व धार्मिक स्थळे भाविकांसाठी बंद करण्यात आल्याने तसेच लॉकडाउनमुळे शहराच्या सीमादेखील बंद करण्यात आल्याने गावात फक्त अत्यावश्यक सेवेसाठी बाहेर पडणारेच लोक दिसून येत आहे.
दोन आठवड्यांपासून भाविकांचा ओघ पूर्णपणे थांबल्याने मंदिरेही ओस पडली आहेत, तर ज्या ठिकाणी स्नानासाठी तुडुंब गर्दी असते, ते तीर्थराज कुशावर्तही बॅरिकेड्स लावून बंद करण्यात आले आहे. एरव्ही गर्दीच्या गजबजाटात असणारे त्र्यंबकेश्वर मंदिर, कुशावर्त तीर्थ, गोदावरी उगमस्थान, ब्रह्मगिरी पर्वत, निवृत्तिनाथ महाराज संजीवन समाधी मंदिर, श्रीस्वामी समर्थ मंदिर श्री गजानन महाराज संस्थान आदी परिसर सामसूम झाला आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संपूर्ण भारतभर लॉकडाउन घोषित करण्यात आले असल्याने त्र्यंबकेश्वरमधील लाखोंची उलाढालही पूर्णपणे थांबली आहे. त्याचा स्थानिक अर्थकारणावर परिणाम झाला आहे. कुशावर्ताभोवती बॅरिकेडिंग करून ते बंद करण्यात आले आहे.
दर सोमवारी दुपारी ३ वाजता भगवान त्र्यंबक राजाची पालखी कुशावर्त स्नानासाठी येत असते. तेवढ्या काळापुरती बॅरिकेडींग हटविले जातात. पालखी परत गेल्या नंतर परत बॅरिकेडींग लावले जाते. दरम्यान, येत्या १८ एप्रिल रोजी संत निवृत्तीनाथ महाराज यांची उटीची वारी म्हणजे मिनी निवृत्ती नाथ महाराज यात्रा आहे. या दिवशी संत निवृत्तीनाथ महाराज यांच्या संजीवन समाधीला थंड सुवासिक उटीचा लेप चढवितात. तर रात्री १० वाजेनंतर उटी उतरवितात. ती उतरवलेली उटी प्रसाद म्हणून भाविक आपल्या गावी घेऊन जात असतात. या यात्रेला जवळपास एक लाख भाविक येत असतात. यंदा मात्र १५ एप्रिलला लॉकडाउन हटवले तरी एकदम गर्दी होण्यास शासन कदापि मान्य करणार नाही. त्यामुळे यंदा उटीच्या वारीवर कोरोनाचे सावट पसरले आहे.
उटीची वारी भरवायची किंवा नाही, याबाबत शासनाच्या आदेशानुसार संस्थान निर्णय घेईल; पण दरवर्षी संजीवन समाधीला उटीचा लेप पारंपरिक पद्धतीने देऊन महापूजा होणारच आहे. त्यासाठी फक्त विश्वस्त मंडळ, पुजारी एवढेच माणसे उपस्थित राहतील. अर्थात शासन काय निर्णय घेईल यावर सर्व अवलंबून असेल.
- पवनकुमार भुतडा, अध्यक्ष, संत निवृत्तिनाथ समाधी संस्थान