अधिकमासाच्या सांगतेनिमित्त गोदापात्रात तीर्थस्नान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 14, 2018 01:33 AM2018-06-14T01:33:42+5:302018-06-14T01:33:42+5:30
नाशिक : अधिकमासाच्या सांगतेनिमित्त अखेरचे पर्व साधण्यासाठी भाविकांनी अधिक ज्येष्ठ अमावास्येनिमित्त दक्षिणवाहिनी गंगा-गोदावरीच्या रामकुंडावर तीर्थस्नानासाठी गर्दी केली होती. यामुळे अवघा रामकुंडाचा परिसर फुलल्याचे चित्र पहावयास मिळाले. अधिकमास हा पवित्र महिना मानला जातो. १६ मेपासून अधिकमासाला प्रारंभ झाला होता. बुधवारी संपूर्ण दिवसभर अमावास्या होती, त्यामुळे हा दिवस अधिकमास समाप्तीचा धरला गेला. ही अमावास्या फलदायी व शुभ असल्याची धारणा आहे. यामुळे बहुतांश महिलांनी वाण दिले. तसेच दानधर्म करत धार्मिक कार्यावर भर दिला. मंदिरांमध्ये पूजा-पाठ, मंत्रजप करताना भाविक दिसून आले. तसेच गोदावरीला भाविकांनी यावेळी दीप अर्पण करत फुले वाहिली. या काळात देवप्रतिष्ठा, विवाह, गृहप्रवेश, मुंज आदी बाबी वर्ज्य मानल्या आहेत. अधिकमासाची मुख्य देवता भगवान विष्णू असल्याचे मानले जाते. भगवान विष्णू यांची कृपी व्हावी यासाठी भाविकांनी या महिन्यात व्रत केले. बत्तासे दान करण्यात आले. दरम्यान, सकाळपासून रामकुंडावर भाविकांचे मोठ्या संख्येने आगमन होऊ लागले होते. त्यामुळे दुपारपर्यंत भाविकांच्या गर्दीने संपूर्ण रामकुंड परिसर गर्दीने फुलून गेला होता. रामकुंडावर बत्तासे, फुले, दीप विक्रेत्यांनी दुकाने थाटली होती. त्यामुळे मोठ्या संख्येने भाविकांनी गोदावरीला दीप व फुले अर्पण केली.