तिसगाव, सोनजांबला विलगीकरण कक्ष सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2021 09:01 PM2021-04-19T21:01:46+5:302021-04-20T00:10:05+5:30
दिंडोरी : तालुक्यातील ग्रामीण भागात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून, रुग्णालयात जागा मिळणे अशक्य होत असल्याने, तिसगाव ग्रामपंचायतकडून ग्रामस्थांसाठी जनता विद्यालयात मंगळवार (दि.२०) पासून विलगीकरण कक्ष सुरू होणार आहे.
दिंडोरी : तालुक्यातील ग्रामीण भागात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून, रुग्णालयात जागा मिळणे अशक्य होत असल्याने, तिसगाव ग्रामपंचायतकडून ग्रामस्थांसाठी जनता विद्यालयात मंगळवार (दि.२०) पासून विलगीकरण कक्ष सुरू होणार आहे.
सोनजांब येथील ग्रामस्थांनीही कोरोनासोबतची लढाई संपूर्ण गाव मिळून लढणार असल्याची योजना आखली आहे. सर्व ग्रामस्थांनी एकत्र येत, मंगल कार्यालयात कोविड सेंटर उभे केले आहे. सोमवारी या कोविड सेंटरचे उद्घाटन जि.प. सदस्य भास्कर भगरे, डॉ.सावंत, सोनजांबचे ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत झाले. गावातील सप्तशृंगी लॉन्समध्ये कोविड सेंटर सुरू केले आहे. यासाठी येणारा खर्च गावातून वर्गणी काढून करण्यात येत आहे. त्याला मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळत एक लाखापेक्षा अधिक रक्कम जमा झाली. सोनजांब येथील रुग्णांना गावातच विलगीकरण कक्ष तयार करून, डॉक्टरही नेमण्यात आले आहेत. यासाठी लागणाऱ्या सर्व उपाययोजनांची तयारी करूनच कोविड सेंटर उभे करत असून, गावकऱ्यांना गावातच कोविडवर उपचार होणार असल्याने बेडसाठी होणारी धावाधाव आदी अनेक समस्यांवर तोडगा निघेल, असा विश्वास सोनजांब ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे.
सर्वच ग्रामपंचायतकडून गावात विलगीकरण कक्ष उभारावेत, यासाठी गावातील शाळा किंवा योग्य असेल, त्या खोल्या ताब्यात घेऊन तिथे कोविड सेंटर उभे करावे व त्यासाठी येणारा खर्च हा १५ वित्त आयोगातून खर्च करण्याची परवानगी द्यावी. त्याकरिता राज्याच्या ग्रामविकासमंत्री यांना मेलही केला आहे.
- अश्विनी भालेराव, ग्रा.प. सदस्य, तिसगाव.