पिंपळगावी लसीकरण केंद्रावर तोबा गर्दी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2021 12:57 AM2021-04-24T00:57:22+5:302021-04-24T00:57:40+5:30
पिंपळगाव बसवंत शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला असून, त्याला आवर घालण्यासाठी नागरिक कोरोना प्रतिबंधक लस घेण्यासाठी केंद्रावर गर्दी करत आहेत. मात्र जिल्ह्यात सर्वांत मोठी बाजारपेठ असलेल्या शहरात केवळ एकच लसीकरण केंद्र असल्याने नागरिकांची तुडुंब गर्दी दिसून येत असून, शासनाने नेमून दिलेल्या नियमांना हरताळ फासला जात आहे.
पिंपळगाव बसवंत : शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला असून, त्याला आवर घालण्यासाठी नागरिक कोरोना प्रतिबंधक लस घेण्यासाठी केंद्रावर गर्दी करत आहेत. मात्र जिल्ह्यात सर्वांत मोठी बाजारपेठ असलेल्या शहरात केवळ एकच लसीकरण केंद्र असल्याने नागरिकांची तुडुंब गर्दी दिसून येत असून, शासनाने नेमून दिलेल्या नियमांना हरताळ फासला जात आहे. प्रशासनाच्या ढिसाळ नियोजनाबाबत नागरिकांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे.
दिवसेंदिवस कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत असल्याने शासनामार्फत कोरोना निर्बंधदेखील लादले जात आहेत. त्यासाठी अत्यावश्यक सेवा वगळता इतर आस्थापने बंद ठेवून कडक निर्बंध लावण्यात आले असतानादेखील रुग्ण संख्या वाढत आहे. ऑक्सिजन बेड व इंजेक्शनचा वेळेत पुरवठा न झाल्याने अनेक रुग्ण मृत्युमुखी पडत आहेत. त्याला प्रतिबंधक घालण्यासाठी नागरिक कोरोना प्रतिबंधक लसीकरणासाठी गर्दी करत आहेत. पिंपळगाव शहरात एकच लसीकरण केंद्र असल्याने आरोग्य केंद्रांवर सकाळपासूनच लोकांची तुडुंब गर्दी वाढू लागली आहे. त्यात योग्य नियोजन नसल्याने फिजिकल डिस्टन्सिंगचा पूर्णपणे फज्जा उडताना दिसत आहे. त्यामुळे प्रशासनाने अजून लसीकरण केंद्र वाढवून लसीकरण करावे मागणी नागरिकांकडून होत आहे.
लसीकरणासाठी
अपुरे डोस
लसीकरणाचे अपुरे डोस असल्याने तासन्तास रांगेत उभे राहिल्यावरही लस न मिळाल्याने अनेकांना माघारी परतावे लागते. डोस उपलब्ध होत नसल्याने लसीकरण मोहिमेला फटका बसू लागला आहे. दरम्यान, ऑनलाइन नोंदणीशिवाय नागरिकांनी लसीकरणासाठी केंद्रावर येऊच नये, असे आवाहन प्रशासनाने करणे गरजेचे आहे. मात्र लोक केंद्रावर तुडुंब गर्दी करत आहे.