नायगाव केंद्रावर लसीकरणासाठी तोबा गर्दी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2021 10:59 PM2021-04-10T22:59:38+5:302021-04-11T00:11:10+5:30
नायगाव : येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात कोरोना प्रतिबंधक लस घेण्यासाठी नागरिकांनी तोबा गर्दी केल्याने आरोग्य कर्मचाऱ्यांची एकच धांदल उडाली. एकाच दिवसात २०० लोकांना प्रतिबंधक लस देण्यात आली.
नायगाव : येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात कोरोना प्रतिबंधक लस घेण्यासाठी नागरिकांनी तोबा गर्दी केल्याने आरोग्य कर्मचाऱ्यांची एकच धांदल उडाली. एकाच दिवसात २०० लोकांना प्रतिबंधक लस देण्यात आली.
सिन्नर तालुक्यातील नायगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात गेल्या काही दिवसापासून कोरोनाची प्रतिबंधक लस देणे सुरू झाले आहे. आठवड्यातून सोमवार, बुधवार व शनिवार या तीन दिवशी ही लस देण्यात येते. शनिवारी (दि.१०) परिसरातील नागरिकांनी अचानक गर्दी केल्याने आरोग्य कर्मचाऱ्यांची चांगलीच धांदल उडाली. येथील केंद्रातून २०० नागरिकांना ही लस देण्यात आल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी विजय घिगे यांनी दिली.
गेल्या काही दिवसापासून केंद्रात लस उपलब्ध झाली आहे. मात्र सुरुवातीला लस घेण्यासाठी एवढी गर्दी झाली नाही. मात्र गेल्या आठवडाभरापासून नायगावसह खोऱ्यातील गावांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने ही प्रतिबंधक लस घेण्यासाठी सध्या गर्दी होत आहे.
नायगाव परिसरात दिवसेंदिवस रुग्णसंख्या वाढत आहे. त्यामुळे ग्रामपंचायत प्रशासन सतर्क झाले असून, गर्दी टाळण्यासाठी व मास्कचा वापर वाढविण्यासाठी कठोर उपाययोजना करीत आहे. गाव व परिसरातील कोरोना संख्या कमी करणे आपल्याच हातात असल्यामुळे प्रत्येकाने काळजी घेणे गरजेचे आहे.
- मनीषा कदम, सरपंच, नायगाव