तुकाराम मुंढे समर्थकांचा आक्रमक पवित्रा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2018 01:15 AM2018-11-28T01:15:03+5:302018-11-28T01:15:17+5:30
महापालिकेच्या आयुक्तपदी कोण? याचे उत्तर अधांतरी असताना दुसरीकडे बदली झालेल्या तुकाराम मुंढे यांचे समर्थक रस्त्यावर उतरण्यासाठी आक्रमक झाले असून, शक्तिप्रदर्शनासाठी सोशल मीडियावर जोर धरला आहे.
नाशिक : महापालिकेच्या आयुक्तपदी कोण? याचे उत्तर अधांतरी असताना दुसरीकडे बदली झालेल्या तुकाराम मुंढे यांचे समर्थक रस्त्यावर उतरण्यासाठी आक्रमक झाले असून, शक्तिप्रदर्शनासाठी सोशल मीडियावर जोर धरला आहे. येत्या गुरुवारी (दि.२९) काढण्यात येणाऱ्या मोर्चात ‘आप’च्या नेत्या अंजली दमानिया, विश्वंभर चौधरी यांच्यासह अन्य अनेक मान्यवर यात सहभागी करण्यात आले आहे.
महापालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांची बदली ही अन्याय असून, त्यांना पूर्णकाळ मिळावा यासाठी गेल्या आठवड्यातदेखील आंदोलन करण्यात आले होते. मात्र आता गुरुवारी (दि.२९) खºया अर्थाने शक्तिप्रदर्शन करण्यात येणार असून, त्यासाठी विविध संघटना आणि थेट नागरिक यांचा पाठिंबा मिळवण्यासाठी आंदोलने करण्यात येणार आहेत. व्हॉट्स अॅप, फेसबुकसारख्या सोशल मीडियावरून जोरदार मुंढे बदली प्रकरणी राज्य सरकार आणि भाजपा तसेच सर्वपक्षीय नगरसेवकांवर हल्ले करण्यात येत असून, मुंढे यांची बदली का केली याचा जाब विचारला जात आहे.
‘मुंढे तुमचे चुकलेच’ या शीर्षकाखाली त्यांनी केलेल्या कामांचा लेखाजोखा मांडला जात आहे. मुंढे यांनी प्रस्तावित केलेल्या योजना या पारदर्शी होत्या त्याला आता टक्केवारीचे ग्रहण लागेल, तसेच प्रशासन खिळखिळे होईल, ई-कनेक्टवर तक्रार केली म्हणून आता कोणी कर्मचारी त्याची दखल घेऊन मुंढे यांच्या धास्तीने प्रश्न सोडविणार नाहीत, अशा अनेक प्रकारच्या पोस्ट व्हायरल केल्या जात आहेत. मुंढे यांनी करवाढ केली, अतिक्रमणे हटविली, बेकायदेशीर मिळकती उघड केल्या याबाबत होत असलेल्या टीकेबाबत विविध व्यावसायिक, विक्रेते सामाजिक, कामगार संघटनांना समजावून घेऊन त्यांना मोर्चात सहभागी करून घेतले जात आहे.
जनहित याचिका दाखल करण्याची तयारी
प्रशासकीय कारण देऊन तुकाराम मुंढे यांची नऊ महिन्यांत बदली करण्यात आल्याचे निमित्त करून आता जनहित याचिका दाखल करण्याचीदेखील तयारी सुरू आहे. मुंढे यांची तीन वर्षांसाठी नियुक्ती असल्याने पूर्ण कालावधी त्यांना मिळावा यासाठी गुरुवारी (दि. २७) मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात येणार आहे. त्यासाठी कागदपत्रांची जुळवाजुळव सुरू आहे.
आयुक्तपदासाठी अनेक नावांची केवळ चर्चाच
महापालिकेच्या आयुक्तपदी राधाकृष्ण गमे अथवा राधाकृष्णन बी. यांच्या नावाची चर्चा असताना दुसरीकडे मात्र अद्यापही अनेक नावांची चर्चा असून, त्यात नव्याने भर पडली जात आहे. त्यामुळे राज्य शासनाचादेखील कस लागल्याची चर्चा होत आहे.