वैद्यकीय प्रवेशासाठी आज २४ केंद्रांवर नीट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2021 04:18 AM2021-09-12T04:18:22+5:302021-09-12T04:18:22+5:30
वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमांसाठी होणाऱ्या या प्रवेश परीक्षेसाठी सुरक्षिततेसह कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे नियमावली नॅशनल टेस्टिंग एजन्सीने जाहीर केली आहे. त्यानुसार परीक्षार्थ्यांना ...
वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमांसाठी होणाऱ्या या प्रवेश परीक्षेसाठी सुरक्षिततेसह कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे नियमावली नॅशनल टेस्टिंग एजन्सीने जाहीर केली आहे. त्यानुसार परीक्षार्थ्यांना काटेकोरपणे पालन करावे लागणार असून, परीक्षेपूर्वी तीन तास अगोदरपासूनच परीक्षा केंद्रावर टप्प्याटप्प्याने प्रवेश दिले जाणार आहेत. देशभरातील विविध वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये प्रवेशासाठी होणाऱ्या राष्ट्रीय पात्रता प्रवेश परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना या वर्षीही ‘ड्रेस कोड’ लागू असणार असून, त्याचे विद्यार्थ्यांनी काटेकोर पालन करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सप्टेंबर २०२० मध्ये झालेल्या परीक्षेत विद्यार्थ्यांना काहीशी सूट देण्यात आली होती. परंतु, यावर्षी पुन्हा कोरोनाचा प्रादुर्भाव काहीसा कमी झाल्याने नियमांचे काटेकोर अंमलबजावणी करीत परीक्षा घेतली जाणार आहे.
प्रतिबंधात्मक उपाययोजना
विद्यार्थ्यांची परीक्षा केंद्राबाहेर गर्दी टाळण्यासाठी सुरक्षित अंतराचे पालन करून किमान वीस विद्यार्थी, विद्यार्थिनींच्या रांगेचे नियोजन करण्यात आले असून, ओळखपत्र व इतर कागदपत्रांच्या तपासणीवेळी विद्यार्थी व विद्यार्थिनींसाठी स्वतंत्र रजिस्ट्रेशन कक्षाची व्यवस्था असणार आहे. एका कक्षात १० विद्यार्थ्यांसाठी एनटीएने नियोजन केले आहे.
परीक्षा केंद्रावर मिळणार मास्क
‘नीट’साठी विद्यार्थ्यांना केवळ ॲडमिट कार्ड आणि ओळखपत्र परीक्षा केंद्रात सोबत नेण्याची परवानगी असून मास्क परीक्षा केंद्रावर दिले जाणार आहे. परीक्षा कक्षात सॅनिटायझर आणि हँडवॉशची व्यवस्था करण्यात आली असून सर्व परीक्षा केंद्रांचे परीक्षेपूर्वी आणि नंतर निर्जंतुकीकरण केले जाणार आहे.
मेटल डिटेक्टरद्वारे तपासणी
परीक्षार्थ्यांची मेटल डिटेक्टरद्वारे तपासणी करण्यात आल्यानंतर त्यांना परीक्षा केंद्रामध्ये प्रवेश दिला जाणार आहे. कोणत्याही प्रकारचा कागद, कॅल्क्युलेटर, रायटिंग पॅड, घड्याळ, मोबाइल, ब्लूटूथ, हेल्थ बँड, खाद्यपदार्थ परीक्षा केंद्रात सोबत नेण्याची विद्यार्थ्यांना परवानगी मिळणार नाही.