प्रतिजेजुरीत आजपासून यात्रोत्सवास प्रारंभ
By admin | Published: February 11, 2017 11:43 PM2017-02-11T23:43:10+5:302017-02-11T23:43:32+5:30
खोबरे-भंडाऱ्याची उधळण : चार दिवसीय यात्रेत लाखो भाविक लावणार हजेरी
पांगरी / निऱ्हाळे : प्रतिजेजुरी म्हणून लौकिकास पावलेल्या मऱ्हळ येथील खंडेराव महाराज यात्रोत्सवास रविवारपासून (दि. १२) प्रारंभ होत आहे. चार दिवस चालणाऱ्या यात्रोत्सवात सुमारे लाखभर भाविक ‘येळकोट येळकोट, जय मल्हार’चा जयघोष व खोबरे-भंडाऱ्याची उधळण करीत दर्शनासाठी हजेरी लावतात. शनिवारी मध्यरात्री पांगरी येथील मानाचा रथ गावात आल्यानंतर यात्रोत्सवास प्रारंभ होणार आहे. आकर्षक विद्युत रोषणाईने सजविलेला रथ मंदिरासमोर आल्यानंतर खंडेराव महाराज पालखी व देवाच्या मुखवट्याची विधिवत पूजा करण्यात येते. सामुदायिक आरती झाल्यानंतर रथाच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी उसळते. ‘येळकोट येळकोट, जय मल्हार’च्या जयघोषाने परिसर दणाणून जातो. रात्री रथ व खंडेराव महाराजांची पालखी मिरवत निऱ्हाळे रस्त्यावरील ‘महल’ बागेत नेण्यात येते. याप्रसंगी निऱ्हाळे, सुरेगाव, मऱ्हळ, पांगरी, कणकोरी, खंबाळे, वावी आदि गावांतील भाविक आपले देव महल बागेत भेटीसाठी आणतात. त्यानंतर पहाटे ६ वाजेपर्यंत वाघे मुरळीचा जागरणाचा कार्यक्रम पार पडतो. यावेळी मंदिरातील अनंत योग देव्हाऱ्याचे विधिवत पूजन केले जाते. रविवारी सकाळी ७ वाजेपासून १० वाजेपर्यंत विविध धार्मिक कार्यक्रम पार पडणार आहेत. ११ वाजता लोकनाट्य तमाशाचा कार्यक्रम होणार आहे. त्यानंतर दिवसभर नवसपूर्ती कार्यक्रम पार पडतात. रात्री ९ वाजता लोकनाट्य तमाशा कार्यक्रम होणार आहे. सोमवारी सकाळी तमाशा कलावंतांचा हजेरीचा कार्यक्रम होणार आहे. त्यानंतर दिवसभर भाविक दर्शनासाठी मंदिरात गर्दी करतात. दुपारी ३ वाजता कुस्त्यांची दंगल होणार असून त्यात राज्यभरातील नामवंत मल्ल सहभागी होणार आहेत. मंगळवारी यात्रेच्या शेवटच्या दिवशी मंदिर दिवसभर दर्शनासाठी खुले राहणार आहे. रात्री १० वाजता देव घरी जाण्याच्या कार्यक्रमास प्रारंभ होतो. खंडेराव महाराज पालखीची महाल बागेतून मंदिरापर्यंत भंडाऱ्याची उधळण करीत मिरवणूक काढण्यात येते. यावेळी भाविक हातात बुधली घेऊन देवाला निरोप देण्यासाठी मिरवणुकीत सहभागी होतात. यात्रा काळात कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी वावी पोलिसांच्या वतीने चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. प्रवाशांच्या सोयीसाठी सिन्नर आगाराच्या वतीने दिवसभर ‘सिन्नर-निऱ्हाळे’ व ‘पांगरी-मऱ्हळ’ बसेस सुरु असणार आहेत. यात्रा शांततेत पार पाडण्यासाठी जय मल्हार मित्र मंडळ व ग्रामस्थ परिश्रम घेत आहेत. (वार्ताहर)
पांगरी गावातील प्रत्येकी एका कुळास दरवर्षी यात्रेतील रथाचा मान मिळतो. यंदा ही जबाबदारी पवार व पेखळे यांना हा मान देण्यात आलेला आहे. पांगरी येथून रथ जाईपर्यंत मऱ्हळ कोणताही धार्मिक विधी सुरु होत नाही. शुक्रवारी पांगरी येथे विधीवत पुजा केल्यानंतर सजविला रथ व पालखी मिरवणूक काढून रात्री उशिरा रथ दर्पात नेण्यात आला होता. शनिवारी पुन्हा मिरवणूक काढून रात्री मऱ्हळ गावाकडे रथाचे प्रस्थान होईल. पांगरी येथून रथ आल्यानंतर यात्रेस सुरुवात होणार आहे. आकर्षक विद्युत रोषणाईने सजविलेला रथ वाजत गाजत मंदिरासमोर आल्यावर खंडेराव महाराजांच्या पालखी व मूर्तीची विधिवत पूजा केली जाते.