आज बैलपोळा : पशुगणनेनुसार जिल्ह्यात बैलांची संख्या सव्वापाच लाख
By admin | Published: September 1, 2016 12:34 AM2016-09-01T00:34:53+5:302016-09-01T00:42:10+5:30
जिल्ह्यात ‘सर्जा-राजा’पेक्षा गोमाता अधिक
गणेश धुरी : नाशिक
बळीराजाच्या कुटुंबातील महत्त्वाचा घटक मानल्या जाणाऱ्या ‘सर्जा-राजा’ची संख्या घटू लागल्याने आगामी काळात शेतकामासाठी बळीराजाला वेगळे नियोजन करावे लागण्याची चिन्हे आहेत.
जिल्ह्यात झालेल्या १९व्या पशुगणनेनुसार एकूण १२ लाख ५३ हजार ३९८ पशुसंख्येपैकी जवळपास सात लाख २८ हजार ८४९ गायी व पाच लाख २४ हजार ५४९ बैलांची नोंदणी करण्यात आली आहे. त्यामुळे १९व्या पशुगणनेनुसार सर्जा-राजापेक्षा गोमातांची संख्याच अधिक वाढल्याचे बोलले जाते.असे असले तरी आधुनिक स्पर्धेच्या काळात बैलांपेक्षा गायींची संख्या वाढत असल्याचे पशुगणनेतून स्पष्ट झाले आहे. जिल्ह्यात असलेल्या एकूण गाय गटाची संख्या साडेबारा लाखांच्या आत असून, त्यात सर्वाधिक साडेसात लाख संख्या गायींची आहे, तर बैलांची संख्या सव्वापाच लाखांच्या घरात आहे. बैलांपेक्षा गायींची संख्या अधिक असण्याची वेगवेगळी कारणे असली तरी, आजही देशात गोपालक आणि गोपूजकांची संख्या जास्त असल्यानेच बैलांपेक्षा गायींची संख्या अधिक असल्याचे बोलले जाते. जिल्ह्यात असलेल्या बैलांची सर्वांत कमी संख्या नाशिक तालुक्यात अवघी १६ हजार ८७४ आहे, तर सर्वाधिक संख्या मालेगाव तालुक्यात ५८ हजार ५३४ इतकी आहे, तर गायींची सर्वांत कमी संख्या पेठ तालुक्यात १४ हजार ३१७ तर सर्वाधिक गायींची संख्या पुन्हा मालेगाव तालुक्यातच ९१ हजार ३८६ इतकी आहे. नाशिकला वाढते शहरीकरण बैलांची संख्या घटण्यास कारणीभूत असल्याचे मानले जाते. तर पेठ तालुक्यात डोंगराळ आणि जंगली भाग असल्याने हिंस्रपशुंमुळे तेथे गायींची संख्या कमी असल्याचे बोलले जाते.