विलिनीकरणाविरोधात आज बँक ांचा संप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2018 12:55 AM2018-12-26T00:55:10+5:302018-12-26T00:55:32+5:30
बँक आॅफ बडोदा, देना बँक आणि विजया बँक या तीन बँकांच्या प्रस्तावित विलिनीकरणाविरोधात देशभरातील दहा लाख बँक कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी बुधवारी (दि. २६) एकदिवसीय संप पुकारला आहे.
नाशिक : बँक आॅफ बडोदा, देना बँक आणि विजया बँक या तीन बँकांच्या प्रस्तावित विलिनीकरणाविरोधात देशभरातील दहा लाख बँक कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी बुधवारी (दि. २६) एकदिवसीय संप पुकारला आहे. बँकिंग उद्योगातील शंभर टक्के कर्मचारी आणि अधिकाºयांचे प्रतिनिधित्व करणाºया युनायटेड फोरम आॅफ बँक युनियन या शिखर संघटनेने ही संपाची हाक दिली आहे.
जिल्ह्यातील सर्व राष्ट्रीयीकृत बँका या आंदोलनात सहभागी होणार आहे. त्यामुळे मंगळवारी नाताळची सुटी आणि बुधवारी संपामुळे असे सलग दोन दिवस बँका बंद राहणार असल्याने ग्राहकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होणार आहे. सरकारने प्रस्तावित केलेल्या तिन्ही बँकांचे हे विलिनीकरण अनावश्यक असून, त्याची मागणी अधिकारी, कर्मचारी किंवा भागधारक, ग्राहकांपैकी कोणीही केलेली नाही. विलिनीकरणामुळे सध्या अस्तित्वात असलेल्या अनेक शाखा बंद होण्याची भीती असून, त्याचा त्रास ग्राहकांना सहन करावा लागणार असल्याची संघटनेची भूमिका आहे. सरकारच्या जनधन, मुद्रा, सोशल सेक्टर इन्श्युरन्स स्कीम, प्रधानमंत्री आवास योजना, गॅस सबसिडीसारख्या सर्व योजना बँकांच्या माध्यमातून राबविल्या जातात.
मनुष्यबळ अपुरे
सध्या आहे त्या शाखा व मनुष्यबळ अपुरे असल्याने शाखा विस्ताराची गरज आहे. मात्र सरकारकडून बँकांच्या विलिनीकरणाचा घाट घातल्याने कर्मचारी संख्या कमी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या कारणामुळे अधिकारी संघनांमध्ये संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.