भेटी लागे जीवा...! संत निवृत्तिनाथांची पालखी थाटामाटात पंढरपूरकडे प्रस्थान
By ऑनलाइन लोकमत | Published: June 13, 2022 11:31 AM2022-06-13T11:31:39+5:302022-06-13T11:31:56+5:30
पालखी सोहळा सलग २७ दिवस चालणार आहे, १८ दिवस परतीचा प्रवास आहे.
त्र्यंबकेश्वर (नाशिक)- कोरोनामुळे गेल्या दोन वर्षांपासून खंडित झालेली संत निवृत्तिनाथांची आषाढी पायी दिंडी आज, सोमवारी सकाळी १० वाजता मोठ्या थाटामाटात पंढरपूरकडे रवाना झाली. निवृत्तीनाथांच्या पादुका चांदीच्या रथात विराजमान झाल्यानंतर कुशावर्त तीर्थावर वाजत गाजत नेण्यात आल्या, तेथे नगराध्यक्ष पुरुषोत्तम लोहगावकर यांनी सपत्नीक पूजा केली.
पालखी सोहळा सलग २७ दिवस चालणार आहे, १८ दिवस परतीचा प्रवास आहे. ९ जुलै रोजी पालखी पंढरपूरला पोहोचणार असून १० जुलैला एकादशीला निवृत्तीनाथांची विठुरायाशी भेट होणार आहे. सलग दोन वर्ष कोरोना लॉकडाउन असल्याने पायी दिंडीला पारखा झालेला वारकरी यंदा मात्र पालखीसोबत चालण्यासाठी आतूर झाला होता. विठुरायाच्या ओढीने काही दिवसांपासून वारकरी तयारीला लागले होते. त्र्यंबकेश्वर हे वारकरी संप्रदायाचे आद्यपीठ आहे.
त्र्यंबकेश्वर (नाशिक) : संत निवृत्तीनाथ पालखीचे पंढरपूरला प्रस्थान pic.twitter.com/LS34bGY1L2
— Lokmat (@lokmat) June 13, 2022
संत ज्ञानेश्वर माऊली यांचे गुरू तथा थोरले बंधु संत निवृत्तिनाथ यांना त्र्यंबकेश्वरच्या ब्रह्मगिरीच्या प्रदक्षिणा दरम्यान योगीराज गहिनीनाथांचा अनुग्रह लाभला. त्यांनी तो गुरुप्रसाद माउली ज्ञानेश्वरांना दिला येथील पालखी सोहळा शतकोत्तर आहे. दोन दिवसांपासुन भाविक ब्रह्मगिरी पर्वतावर दर्शनासाठी प्रदक्षिणेसाठी जात त्यामुळे शहर गजबजले आहे. वारीसाठी परभणी, बीड, औरंगाबाद, जालनासह मराठावाड्यातून वाहनाने वारकरी भाविक येथे दाखल झाले होते.