गणेश विसर्जन मिरवणुकीमुळे आज वाहतूक मार्गात बदल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2018 01:07 AM2018-09-23T01:07:46+5:302018-09-23T01:08:03+5:30
श्रीगणेश विसर्जन मिरवणुकीसाठी रविवारी (दि.२३) काढण्यात येणार असून, या दिवशी मिरवणूक मार्गावर वाहतुकीची कोंडी होऊ नये यासाठी काही ठिकाणावरील वाहतूक मार्गात बदल करण्यात आले आहेत़
नाशिक : श्रीगणेश विसर्जन मिरवणुकीसाठी रविवारी (दि.२३) काढण्यात येणार असून, या दिवशी मिरवणूक मार्गावर वाहतुकीची कोंडी होऊ नये यासाठी काही ठिकाणावरील वाहतूक मार्गात बदल करण्यात आले आहेत़ सकाळी १० वाजेपासून ते मिरवणूक संपेपर्यंत वाहतूक मार्गातील बदल लागू असल्याची अधिसूचना पोलीस उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील यांनी काढली आहे़ शहरातील मुख्य मिरवणुकीसह इतर लहान-मोठ्या मंडळांच्या मिरवणुका, घरोघरच्या गणेशमूर्तींचे विसर्जन यासाठी गंगा घाटावर तसेच इतर विविध ठिकाणी मूर्ती संकलन तसेच विसर्जनाची व्यवस्था करण्यात आली आहे. या ठिकाणी अपघात अगर काही गोंधळ होऊ नये यासाठी प्रत्येक विसर्जन ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. श्रीगणेश विसर्जन निमित्त होणाऱ्या विसर्जन मिरवणुका शांततेत पार पडाव्यात यासाठी शहर पोलीस आयुक्तालयाच्या वतीने शहरात कडक पोलीस बंदोबस्ताचे नियोजन केले आहे. शहरातील पोलीस अधिकाºयांसह सुमारे सव्वादोन हजार पोलीस कर्मचारी कार्यरत असणार आहेत.
वाहतुकीतील बदल
पंचवटी डेपो, निमाणी बस स्टॅण्ड, महामार्ग, सिडको इत्यादी विभागांतून नाशिकरोड रेल्वेस्टेशन येथे जाणाºया राज्य परिवहन विभागाच्या बसेस दत्तमंदिर सिग्नलपर्यंत जातील व तेथूनच परत येतील. सिन्नरकडे जाणाºया राज्य परिवहन मंडळाच्या बसेस व इतर वाहने उड्डाणपुलावरून ये-जा करतील.
गंगापूर पोलीस ठाणे (आनंदवली नदीपात्र)
आनंदवली नदीपात्रात विसर्जनासाठी गर्दी होते. यासाठी चांदशीगाव ते आनंदवली नदीपात्र आणि आनंदवली नदीपात्र ते चांदशी गावापर्यंतचा मार्ग दोन्ही बाजूने (मिरवणुकीतील वाहने वगळून) दुपारी ४ वाजेपासून मिरवणूक संपेपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहे. नाशिककडे येणाºया व नाशिकहून चांदशीकडे जाणाºया वाहनधारकांनी आनंदवली पुलाकडे न जाता चांदशीगावरोडने नाशिक तट कालवा येथून उजव्या बाजूने वळून कालव्यामार्गे मखमलाबाद रोडने लागून रामवाडीमार्गे अशोकस्तंभ ते गंगापूररोड अशी ये-जा करावी.
जेलरोड विभाग
नांदूर नाका ते सैलानीबाबा चौक हा मार्ग दोन्ही बाजूने सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी (मिरवणुकीतील वाहने वगळून) दुपारी १२ वाजेपासून ते मिरवणूक संपेपयत बंद ठेवण्यात येणार आहे. या काळात नाशिकरोड विभागातील नांदूर नाका ते सैलानीबाबा चौक या मार्गाने जाणारी वाहने ही नांदूर नाका औरंगाबाद रोडने तपोवनातील स्वामी जनार्दन पूलमार्गे जातील व त्याच मार्गाने येतील.
देवळाली कॅम्प पोलीस ठाणे
श्री गणेश विसर्जन मिरवणुकीच्य दिवशी दुपारी १२ वाजेपासून मिरवणूक संपेपर्यंत नाशिकरोड - देवळाली कॅम्प या मार्गावरील सिलेक्शन कॉर्नर-झेंडा चौक - शारदा हॉटेल - जमा मशिद रोड- जुने बसस्टॅण्ड- सिलेक्शन कॉर्नर- संसरीनाका - संसरीगाव दारणानदीपर्यंतचा मार्ग सर्व प्रकारच्या वाहनांसाठी (मिरवणूकीतील वाहने सोडून) बंद करण्यात येणार आहे़
शहरातील मुख्य विसर्जन मिरवणूक मार्ग
वाकडी बारव (चौक मंडई) येथून जहांगिर मशिद - दादासाहेब फाळके रोड - फुले मार्केट - बादशाही लॉज कॉर्नर - विजयानंद थिएटर - गाडगेमहाराज पुतळा - गो. ह. देशपांडे पथ - धुमाळ पॉइंट - सांगली बँक सिग्नल - महात्मा गांधी रोड - मेहेर सिग्नल - स्वामी विवेकानंद रोड - अशोकस्तंभ - नवीन तांबट आळी - रविवार कारंजा - होळकर पूल - मालेगाव स्टॅण्ड - पंचवटी कारंजा - मालवीय चौक - परशुराम पुरिया रोड - कपालेश्वर मंदिर - भाजीबाजार - म्हसोबा पटांगणावरून विसर्जन ठिकाण.
शहरातील पर्यायी वाहतूक व्यवस्था
या कालावधीत निमाणी बसस्थानकातून पंचवटी कारंजा येथून सुटणाºया शहर वाहतुकीच्या सर्व बसेस पंचवटी डेपोतून सुटतील. ओझर, दिंडोरी, पेठ येथून शहरात येणाºया बसेस व इतर सर्व प्रकारची वाहने ही आडगाव नाका, कन्नमवार पूल व पुढे द्वारका सर्कलकडून नाशिकरोड, नाशिक शहर व इतर ठिकाणी जातील. दरम्यान, पंचवटीकडे जाणारी सर्व वाहने द्वारका सर्कल कन्नमवार पुलावरून जातील. रविवार कारंजा व अशोकस्तंभ येथून सुटणाºया बसेस शालिमार येथून सुटतील व त्याच मार्गाने ये-जा करतील.
नाशिकरोड गणेश विसर्जन
मिरवणूक मार्ग
नाशिकरोडला बिटको चौकातून मिरवणुकीस सुरुवात होईल. बिटको चौकातून सुरू झालेली मिरवणूक शिवाजी महाराज पुतळा - देवी चौक - रेल्वेस्टेशन पोलीस चौकी - सुभाषरोड - सत्कार पॉइंट - देवळालीगाव गांधी पुतळा - खोडदे किराणा दुकान ते वालदेवी नदी देवळालीगावपर्यंत जाणार आहे.