आज पोटनिवडणूक
By admin | Published: August 27, 2016 10:49 PM2016-08-27T22:49:40+5:302016-08-27T22:49:51+5:30
महापालिका प्रभाग : पोलिसांचे संचलन; उद्या मतमोजणी
नाशिकरोड : जेलरोड प्रभाग ३५ व ३६च्या पोटनिवडणुकीसाठी रविवारी (दि. २८) मतदान होणार असून, मनपा प्रशासनाकडून मतदानप्रक्रिया राबविण्याची तयारी पूर्ण करण्यात आली आहे. दरम्यान, शनिवारी दुपारनंतर जेलरोड भागात पोलिसांनी संचलन केले.
जेलरोड प्रभाग ३५ (ब) व ३६ (ब) ची पोटनिवडणूक राजकीय पक्ष व पदाधिकाऱ्यांनी प्रतिष्ठेची केल्याने चांगलीच चुरस निर्माण झाली आहे. रविवारी सकाळी ७ ते ५ या वेळेत होणाऱ्या मतदानासाठी प्रभाग ३५ मध्ये १० हजार ५२५ मतदार असून, वृषाली नाठे (शिवसेना), मंदाबाई ढिकले (भाजपा), शांताबाई शेजवळ (मनसे), वंदना चाळीसगावकर (राष्ट्रवादी कॉँग्रेस) हे निवडणूक रिंगणात आहेत, तर प्रभाग ३६ मध्ये दहा हजार ३९२ मतदार असून, सुनील शेलार (शिवसेना), प्रवीण पवार (मनसे), शशिकांत उन्हवणे (कॉँग्रेस-राष्ट्रवादी), सुनंदा मोरे (भाजपा) हे चार उमेदवार रिंगणात आहेत.
प्रभाग ३५च्या पोट निवडणुकीसाठी जेलरोड पाण्याची टाकी साने गुरुजी मनपा शाळेत १ ते ७ मतदान खोल्या, सेंट फिलोमीना शाळा पाठीमागील बालयेशू सेवासदन येथे ८, ९, १० असे एकूण दहा मतदान केंद्र आहेत, तर प्रभाग ३६ करिता जेलरोड के. एन. केला हायस्कूल १ ते ४ मतदान खोल्या, भीमनगर मनपा व्यायाम शाळा ५ व ६ व नेहरूनगर मनपा शाळा १०८ मध्ये ७, ८, ९ क्रमांकाचे असे एकूण नऊ मतदान केंद्र आहेत.