त्र्यंबकेश्वर मंदिराच्या परिसरात हिंदू महासंघाकडून शुद्धीकरण; तात्काळ कारवाई करण्याची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2023 11:58 AM2023-05-17T11:58:39+5:302023-05-17T11:59:12+5:30
त्र्यंबकेश्वरमध्ये आज विविध हिंदू संघटांनी एकत्र येऊन सदर घटनेचा संताप व्यक्त केला.
त्र्यंबकेश्वर येथील ज्योर्तिलिंग त्र्यंबकराजाच्या मंदिरात प्रवेशासाठी एक विशिष्ट जमाव मुख्य प्रवेशद्वारावर एकत्र झाल्याच्या कथित घटना समोर आली होती. ज्योर्तिलिंग त्र्यंबकराजाच्या मंदिरात हिंदू धर्मीयांव्यतिरिक्त अन्य कुणालाही प्रवेश नसताना गेल्या शनिवारी रात्री अन्य धर्मीयांच्या एका जमावाने मंदिरात घुसखोरीचा केलेला प्रयत्न देवस्थानच्या सुरक्षा रक्षकांनी हाणून पाडला.
त्र्यंबकेश्वरमध्ये आज विविध हिंदू संघटांनी एकत्र येऊन सदर घटनेचा संताप व्यक्त केला. काही विशिष्ट धर्मातील लोकांनी त्र्यंबकेश्वरच्या मंदिरात शिरण्याचा प्रयत्न केला, त्याच्या निषेधार्थ हिंदु महासंघासह इतर हिंदू संघटनेनं आज एकत्र येत त्र्यंबकेश्वरच्या परिसरात आंदोलन केले. तसेच मंदिर परिसरात गोमूत्र शिंपडत हिंदू महासंघाकडून शुद्धीकरणही करण्यात आले. त्याचप्रमाणे संबंधित व्यक्तींवर तात्काळ कारवाई करण्यात यावी, अशी मागणी देखील हिंदू महासंघाकडून यावेळी करण्यात आली.
कथित घटनेची विशेष चौकशी पथकामार्फत (एसआयटी) चौकशीचे आदेश उपमुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. अतिरिक्त पोलिस महासंचालक दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेत ही एसआयटी असेल. याप्रकरणी एफआयआर नोंदवून कारवाईचे आदेशही फडणवीस यांनी दिले. एसआयटी गेल्या वर्षीच्या घटनेचीही चौकशी करेल, ज्यावेळी एक विशिष्ट जमाव त्र्यंबकेश्वरमंदिर परिसरात मुख्य प्रवेशद्वारातून आतमध्ये शिरल्याची कथित घटना घडली होती.
दरम्यान, ज्योर्तिलिंग त्र्यंबकराजाच्या मंदिरात हिंदू धर्मीयांव्यतिरिक्त अन्य कुणालाही प्रवेश नसताना १३ मे रोजी रात्री अन्य धर्मीयांच्या एका जमावाने मिरवणुकीद्वारे जाऊन मंदिरात घुसण्याचा प्रयत्न केला. मात्र, तेथील सुरक्षा रक्षकांनी त्यांना रोखले, असे हे कथित प्रकरण आहे. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर त्र्यंबकेश्वर पोलिसांनी तातडीने सदर मिरवणूक थांबवत चौकशी केली. देवस्थान ट्रस्टच्या सीसीटीव्ही फुटेजचीही पाहणी केली होती.
घुसखोरीप्रकरणी गुन्हा दाखल
त्र्यंबकेश्वर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे आदेश देण्यात आले. यानंतर त्र्यंबकेश्वर देवस्थानचे जनसंपर्क अधिकारी रवी जाधव यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार अकील सय्यद व इतर तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भादंवि कलम २९५,५११ नुसार हा गुन्हा दाखल झाला आहे. त्र्यंबकेश्वरमधील प्रकाराचा अनेक हिंदू संघटनांनी निषेध करून गुन्हेगारांवर कारवाईची मागणी केली. कारवाई न झाल्यास आंदोलनाचा इशाराही त्यांनी दिला आहे.