दहावीच्या परीक्षा रद्दच्या निर्णयाविषयी मत नोंदविण्याची आज शेवटची संधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2021 04:16 AM2021-05-18T04:16:14+5:302021-05-18T04:16:14+5:30
नाशिक - कोविड -१९ विषाणूच्या प्रादुर्भावामुळे उद्भवलेल्या परिस्थितीमुळे बुधवारी (दि.१२ ) दहावीची बोर्डाची परीक्षा रद्द ...
नाशिक - कोविड -१९ विषाणूच्या प्रादुर्भावामुळे उद्भवलेल्या परिस्थितीमुळे बुधवारी (दि.१२ ) दहावीची बोर्डाची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय अधिकृतरीत्या जाहीर केला असला तरी या निर्णयाविषयी विद्यार्थी व पालकांना काय वाटते हे जाणून घेण्यासाठी शिक्षण विभागाने एक लिंक उपलब्ध करून दिली आहे. या लिंकच्या माध्यमातून दहावीचे विद्यार्थी व त्यांच्या पालकांसह दहावीच्या विद्यार्थ्यांना शिकविणाऱ्या शिक्षकांना आणि मुख्याध्यापकांनाही त्यांचे मत ऑनलाईन नोंदविता येणार आहे. अशा प्रकारे ऑनलाईन मत अथवा प्रतिक्रिया नोंदविण्याची आज शेवटची संधी आहे.
शिक्षण विभागाने दहावीच्या बोर्डाच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर दहावीच्या विद्यार्थ्यांचे मुल्यांकन, निकाल यासोबत अकरावीची प्रवेश प्रक्रिया असे अनेक प्रश्न निर्माण झाले आहे. त्यामुळे दहावीच्या वर्गातील विद्यार्थी, पालकांसह शिक्षक व प्रशासकीय घटकांतील माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक, विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख , माध्यमिक शिक्षण विभागातील अधिकारी, उपशिक्षणाधिकारी, गटशिक्षणाधिकारी,प्रशासन अधिकारी, शिक्षणाधिकारी, मंडळातील अधिकारी आदींसाठी स्वतंत्र लिंक उपलब्ध करून देण्यात आल्या असून या सर्व घटकांतील दहावीच्या परीक्षांशी संबंधित व्यक्तींना दहावीच्या परीक्षा रद्द करण्याच्या निर्णयाविषयी त्यांचे मत अथवा प्रतिक्रिया नोंदविता येणार आहे. त्यासाठी दहावीचे विद्यार्थी, त्यांचे पालक, शिक्षक व प्रशासकीय घटकांतील व्यक्तींसाठी प्रश्नावलीची वेगवेगळी लिंक उपलब्ध करून देण्यात आली असून मंगळवारी (दि.१८) दुपारी १२ वाजेपर्यंत सर्व माध्यमिक शाळांना तत्काळ लिंकच्या माध्यमातून प्रतिक्रिया व मत नोंदविण्यासाठी कळविण्यात आले आहे.