आज ‘महाराष्ट्र बंद
By admin | Published: June 5, 2017 01:35 AM2017-06-05T01:35:13+5:302017-06-05T01:35:24+5:30
नाशिक : शेतकऱ्यांनी कर्जमुक्तीसह विविध मागण्या पूर्ण करण्यासाठी सोमवारी (दि. ५) राज्यव्यापी बंदची हाक दिली
’ लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : शेतकरी संपामध्ये सरकार फूट पाडण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप करीत शेतकऱ्यांनी कर्जमुक्तीसह विविध मागण्या पूर्ण करण्यासाठी सोमवारी (दि. ५) राज्यव्यापी बंदची हाक दिली असून, रविवारी मध्यरात्री १२ वाजेपासून या संपाला सुरुवात होणार आहे. या बंददरम्यान राज्यभरातील शेतकरी त्यांच्या बैलगाड्या, जनावरे आणि संपूर्ण कुटुंबासह रस्त्यावर उतरणार आहेत. तसेच कर्जमुक्तीसह शेतकऱ्यांच्या सर्व मागण्या सरकारने मान्य केल्याशिवाय कोणत्याही परिस्थितीत संप मागे न घेण्याचा निर्धारही यावेळी शेतकऱ्यांनी केला.
नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात किसान क्रांती मोर्चाच्या राज्यस्तरीय बैठकीमध्ये राज्यव्यापी बंदची हाक देण्यात आली. तसेच संपाची पुढील दिशा ठरविण्यासाठी सुकाणू समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीतील सदस्यांची सोमवारच्या बंदनंतर मंगळवारी (दि. ६) मुंबईत बैठक होणार आहे. त्यानंतर संपाची पुढील रणनीती तयार करण्यात येणार आहे. या कालावधीत सरकारने शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य केल्या नाही, तर गुरुवारी (दि. ८) नाशिकमध्ये शेतकऱ्यांची राज्यस्तरीय परिषद घेऊन संप आणखी व्यापक करण्यासंबंधी नियोजन करण्याविषयी यावेळी चर्चा करण्यात आली.
या बैठकीत उपस्थित शेतकऱ्यांनी व्यासपीठावर कोणत्याही राजकीय पक्षाच्या नेत्याला प्रवेश नाकारून सरकारी पक्षाकडून शेतकरी संप विरोधकांचा डाव असल्याचा आरोप खोडून काढला. बैठकीला ज्येष्ठ शेतीतज्ज्ञ बुधाजीराव मुळीक, डॉ. अजित नवले, राजू देसले, चंद्रकांत बनकर, डॉ. गिरीधर पाटील, हंसराज वडघुले यांच्यासह विविध पदाधिकारी, ा हजारोंच्या संख्येने शेतकरी उपस्थित होते. दरम्यान, शेतकरी संपादरम्यान अनेक शेतकऱ्यांवर दरोड्याचे गुन्हे दाखल करण्यात आले असून, जर शेतकरी दरोडेखोर असतील तर ते कर्जबाजारी कसे? असा सवालही शेतकऱ्यांनी उपस्थित केला. पुरोगामी संघटना संपावर ठाम
शेतकऱ्यांनी पुकारलेल्या संपाला डाव्या व पुरोगामी चळवळीतील संघटनांनी पाठिंबा दिला आहे. शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य न झाल्यास, गोदी व बंदर कामगार सक्रियपणे संपात सामील होतील, असा इशारा ज्येष्ठ कामगार नेते एस. के. शेट्ये यांनी दिला.