कळवणच्या प्रथम नगराध्यक्षांच्या नावावर आज शिक्कामोर्तब
By admin | Published: November 29, 2015 10:59 PM2015-11-29T22:59:57+5:302015-11-29T23:00:42+5:30
सोपस्कार : सुनीता कौतिक पगार यांचे एकमेव नामनिर्देशनपत्र
कळवण : नगरपंचायतच्या प्रथम नगराध्यक्षा व प्रथम उपनगराध्यक्षपदाची सोमवारी (दि. ३०) निवडणूक होत असून प्रथम नगराध्यक्षपदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुनीता कौतिक पगार यांचे एकमेव नामनिर्देशनपत्र दाखल असल्याने त्यांच्या निवडीवर सोपस्कार पूर्ण होऊन शिक्कामोर्तब होणार आहे. नगराध्यक्षपदाच्या निवडीनंतर प्रथम उपनगराध्यक्षपदाची निवडणूक होत असल्याने या निवडणुकीनेही कळवणकरांचे लक्ष वेधले आहे.
ग्रामपालिकेचे नगरपंचायतमध्ये रूपांतर झाल्यानंतर १ नोव्हेंबरला नगरपंचायतची पहिली सार्वत्रिक निवडणूक होऊन त्यात जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष जयश्री पवार, जिल्हा परिषद सदस्य नितीन पवार, मविप्र संचालक रवींद्र देवरे, पंचायत समितीचे माजी सभापती कौतिक पगार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसने सर्वाधिक ७ जागा काबीज केल्या, तर भाजपा ४, काँग्रेस ३, शिवसेना १ तर दोन जागांवर अपक्ष निवडून आले. त्यामुळे राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून पहिल्यापासूनच सत्तास्थापनेचा दावा केला असताना नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवक सुनीता पगार यांचे एकमेव नामनिर्देशनपत्र दाखल झाल्याने त्यांची बिनविरोध निवड होणे निश्चित झाले असून राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार सोमवारी (दि. ३०) शासकीय सोपस्कार पूर्ण करण्यात आल्यानंतर त्यांच्या नगराध्यक्षपदी निवडीची अधिकृत घोषणा करण्यात येणार आहे. यानंतर उपनगराध्यक्षपदासाठी निवडणूक होणार असल्याने या पदावर क ोणाची वर्णी लागणार याकडे कळवणकरांचे लक्ष लागले असून सर्व नगरसेवकांना विश्वासात घेऊन निवड केली जाणार असल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेसने केला आहे.
दरम्यान, नगराध्यक्ष व उपनगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत काँग्रेसचे नगरसेवक राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर राहणार असून आघाडीचा धर्म पाळणार असल्याचे सूतोवाच काँग्रेसच्या एका ज्येष्ठ नेत्याने के ले असून, नगराध्यक्षांबरोबरच उपनगराध्यक्षपदाची निवडदेखील बिनविरोध होईल, असे संकेत एका नगरसेवकाने दिले आहे. (वार्ताहर)