२७८ केंद्रांवर आज शिष्यवृत्ती परीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2019 11:17 PM2019-02-23T23:17:06+5:302019-02-24T00:01:20+5:30
महाराष्ट राज्य परीक्षा परिषदेच्या माध्यमातून घेण्यात येणारी शिष्यवृत्ती परीक्षा रविवार, दि. २४ रोजी घेतली जाणार आहे. शहर आणि जिल्ह्णातील २७८ केंद्रांवर सदर परीक्षा होणार असून, या परीक्षेसाठी एकूण ४५ हजार ३२७ विद्यार्थी बसले आहेत.
नाशिक : महाराष्ट राज्य परीक्षा परिषदेच्या माध्यमातून घेण्यात येणारी शिष्यवृत्ती परीक्षा रविवार, दि. २४ रोजी घेतली जाणार आहे. शहर आणि जिल्ह्णातील २७८ केंद्रांवर सदर परीक्षा होणार असून, या परीक्षेसाठी एकूण ४५ हजार ३२७ विद्यार्थी बसले आहेत. या परीक्षेचे संपूर्ण नियोजन पूर्ण करण्यात आले असून, विद्यार्थ्यांपर्यंत त्यांचे आसन क्रमांक पोहचविण्यात आले आहेत.
पुणे येथील परीक्षा परिषदेच्या वतीने आणि जिल्हा परिषदेच्या माध्यमातून सदर परीक्षा घेतली जाणार आहे. नाशिक जिल्ह्णातून पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती (पाचवी) आणि पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (आठवी)च्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती परीक्षा जिल्ह्णातील २७८ केंद्रांवर होणार असून, पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा १२२ केंद्रांवर १९,२३८ विद्यार्थी देणार आहेत. त्यासाठी ९५४ पर्यवेक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती (पाचवी) साठी २६ हजार ८९ विद्यार्थी परीक्षा देणार असून, १५६ केंद्रांवर परीक्षा घेतली जाणार आहे.
पहिला पेपर हा दुपारी १ ते २.३०, पेपर क्रमांक २ हा दुपारी ३.३० ते सायंकाळी पाच या वेळेत होणार आहे. सकाळच्या पहिल्या सत्रात प्रथम भाषा आणि गणिताची परीक्षा होणार आहे. दुपारच्या सत्रात तृतीय भाषा आणि बुद्धिमत्ता चाचणी परीक्षा होणार आहे. ३०० गुणांची ही परीक्षा असून ७५-७५ गुणांचे दोन पेपर्स असे परीक्षेचे स्वरूप आहे. परीक्षा सुरळीत पार पडावी यासाठी प्रत्येक केंद्रावर एक याप्रमाणे २७८ केंद्र संचालकांची नियुक्ती करण्यात आली आहे. आब्जेक्टीव टाईप ही परीक्षा असल्याने विद्यार्थ्यांना परीक्षेनंतर उत्तरपत्रिकेची कार्बनप्रिंट मिळणार आहे. स्पर्धा परीक्षेप्रमाणेच विद्यार्थ्याला यामुळे आपल्या गुणांची पडताळणी करणे सोपे होणार आहे. यातून या परीक्षेत अधिक पारदर्शकता आणण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
सदर शिष्यवृत्ती परीक्षा मराठी, इंग्रजी, हिंदी, उर्दू आणि गुजराथी या चार भाषांमध्ये होणार आहे. जिल्ह्णात जिल्हाधिकारी, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विभागाचे तीन भरारी पथके तैनात करण्यात आली आहेत. तर तालुकास्तरावर गटशिक्षणाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली भरारी पथके परीक्षेवर नजर ठेवून असणार आहेत.
विशेष म्हणजे यंदा विद्यार्थ्यांना उत्तरपत्रिकेवर हाताने आसन क्रमांक लिहावा लागणार नाही, तर तो उत्तरपत्रिकेवर प्रिंटेड असणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्याचा उत्तरपत्रिका भरण्यासाठी लागणारा वेळदेखील वाचणार आहे. स्वाक्षरी पटदेखील छापील असल्यामुळे यावर विद्यार्थ्यांना केवळ सही करावी लागणार आहे.
सैनिकी परीक्षेला ७२ विद्यार्थी
शिष्यवृत्ती परीक्षेच्या काळातच अखिल भारतीय सैनिकी परीक्षादेखील आहे. शिष्यवृत्तीला बसलेले ७२ विद्यार्थी सैनिकी परीक्षेला पात्र ठरल्याने त्यांचीही परीक्षा रविवार, २३ रोजीच होणार आहे. विद्यार्थ्यांची होणारी अडचण लक्षात घेऊन अशा सर्व विद्यार्थ्यांची परीक्षा ही सकाळी १० ते १२ या वेळेत शासकीय कन्या शाळा या ठिकाणी होणार आहे.