आज, उद्या दुकाने राहाणार बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2021 04:27 AM2021-03-13T04:27:25+5:302021-03-13T04:27:25+5:30
नाशिक : कोरेानाचा संसर्ग रोखण्यासाठी जिल्ह्यात लागू करण्यात आलेल्या निर्बंधानुसार, शनिवार आणि रविवार असे सलग दोन दिवस बाजारपेठा पूर्णपणे ...
नाशिक : कोरेानाचा संसर्ग रोखण्यासाठी जिल्ह्यात लागू करण्यात आलेल्या निर्बंधानुसार, शनिवार आणि रविवार असे सलग दोन दिवस बाजारपेठा पूर्णपणे बंद राहाणार आहेत. वृत्तपत्र वितरणासह जीवनाश्यक सेवा मात्र सुरळीत सुरू राहतील. या बंदसाठी जिल्हा, तसेच पोलीस प्रशासन सज्ज झाले आहे. दरम्यान, शहरातील बंदबाबत महापालिका ॲक्शन मोडवर असून, सर्व प्रकारची सज्जता मनपाने ठेवली आहे. जिल्ह्यात कोराेनाचे रुग्ण वाढत असल्याने, जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी बुधवारपासून जिल्ह्यात काही निर्बंध लागू केले आहेत. त्यानुसार, सोमवार ते शुक्रवार या दिवशी सकाळी सात ते सायंकाळी सात या कालावधीतच दुकाने सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आलेली आहे. शनिवार आणि रविवार बाजारपेठा पूर्णपणे बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आलेले आहे. त्यानुसार, शनिवारी (दि.१३) बंदचा पहिला दिवस आहे. या बंदबाबत दिवसभर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कार्यालयाचे फोन खणखणत होते. नेमके काय सुरू आणि काय बंद याबाबतचे असंख्य प्रश्न विचारण्यात येत होते.
जिल्हा प्रशासनाने निर्बंध लागू केलेले असले, तरी आता महापालिका अंमलबजावणीसाठी सज्ज झाली आहे. यासाठी खास पथक तैनात करण्यात आले आहे. मनपा आयुक्त बंदच्या पार्श्वभूमीवर शनिवारी सकाळी तातडीची बैठक घेणार आहे. पोलीस प्रशासनही कायदा सुव्यवस्थेसाठी सज्ज झाले आहे.
कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी बाजारातील गर्दी कमी करण्याच्या दृष्टीने दुकानांवर निर्बंध घालण्यात आलेले आहेत. शनिवार आणि रविवारी असलेल्या सुट्टीचा फायदा घेऊन लोक मोठ्या प्रमाणात बाजारपेठेत गर्दी करतात. या गर्दीवर नियंत्रण आणण्यासाठी लग्न सोहळे आणि बाजारपेठेतील गर्दी नियंत्रित करण्यासाठी काही प्रमाणात निर्बंध आदेश लागू करण्यात आलेले आहे. जीवनावश्यक सेवा ज्यामध्ये वृत्तपत्र वितरण, मेडिकल, भाजीपाला, किराणा माल, दुग्ध वितरण, रुग्णालये, रुग्णवाहिका या सेवा सुरू राहाणार आहेत. खाद्यपदार्थांचे ढाबे, हातगाडी हेही बंद राहतील. हॉटेल्स व बार आठवडाभरासाठी ५० टक्के बंधनाच्या क्षमतेने मात्र रात्री नऊपर्यंतच तर त्यांची पार्सल सेवा रात्री दहापर्यंत सुरू राहणार आहे.