आज नशिबाची परीक्षा
By admin | Published: February 23, 2017 12:25 AM2017-02-23T00:25:28+5:302017-02-23T00:25:39+5:30
८२१ उमेदवार : उत्कंठा वाढली, मातब्बरांच्या लढतीकडे लक्ष
नाशिक : महापालिकेत सत्तापरिवर्तन होणार काय, कोणता पक्ष बहुमताचा आकडा गाठणार, कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार, कोणाचे भाग्य उजळणार... यांसारखे नाना प्रश्न नाशिककरांना गेल्या दीड ते दोन महिन्यांपासून सतावत असताना त्यांची उत्तरे गुरुवारी (दि.२३) मतमोजणी प्रक्रियेनंतर मिळणार आहेत. त्यामुळे मतमोजणीबाबत उमेदवारांसह सर्वांचीच उत्कंठा वाढली असून, मातब्बरांच्या लढतीकडे लक्ष लागून राहिले आहे. महापालिका निवडणुकीसाठी यंदा बहुसदस्यीय प्रभाग रचना अस्तित्वात आणली गेली. एकूण ३१ पैकी दोन प्रभागांमधून प्रत्येकी तीन तर उर्वरित २९ प्रभागांमधून प्रत्येकी चार नगरसेवक निवडून देण्याची जबाबदारी नाशिककरांवर सोपविण्यात आली. त्यानुसार, मंगळवारी (दि. २१) मतदान घेण्यात येऊन मतदानाची टक्केवारी ६१.६० टक्के नोंदली गेली. मागील निवडणुकीच्या तुलनेत यंदा सुमारे पाच टक्क्यांनी मतदानाच्या टक्केवारीत वाढ झाली. त्यामुळे निकालाबाबत राजकीय तज्ज्ञही संभ्रमित आहेत. गेल्या दोन-तीन महिन्यांपासून महापालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू होती. शिवसेना, भाजपा, मनसे, कॉँग्रेस, राष्ट्रवादी, माकपा, बसपा, सपा यांसह छोट्या राजकीय पक्षांनी निवडणुकीत आपली सारी ताकद पणाला लावत चुरस निर्माण केली. उद्धव ठाकरे, राज ठाकरे व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जाहीर सभांवरूनही गेल्या काही दिवसांत निकालाबाबत आडाखे बांधले जात आहेत. (प्रतिनिधी)
दुपारी ४ वाजेपर्यंत निकाल अपेक्षित
मतमोजणीची प्रक्रिया सकाळी १० वाजता सुरू झाल्यानंतर दुपारी ४ वाजेपर्यंत निकाल हाती येण्याची शक्यता आहे. पहिल्या तासाभरात प्रामख्याने भाजपाच्या रंजना भानसी, राष्ट्रवादीच्या कविता कर्डक, अपक्ष भगवान भोगे, शिवसेनेचे अजय बोरस्ते, गोकुळ पिंगळे, भाजपाचे योगेश हिरे, कॉँग्रेसचे शाहू खैरे, राष्ट्रवादीचे गजानन शेलार, मनसेच्या सुरेखा भोसले, शिवसेनेचे उमेदवार व माजी महापौर यतिन वाघ, माजी महापौर अशोक दिवे यांचे पुत्र प्रशांत दिवे, शिवसेनेचे शैलेश ढगे, भाजपाच्या संगीता गायकवाड, संभाजी मोरुस्कर, शिवसेनेचे सुधाकर बडगुजर व हर्षा बडगुजर, मनसेचे अनिल मटाले व कांचन पाटील, उत्तम दोंदे, शोभा फडोळ, विलास शिंदे व अमोल पाटील यांचा निकाल हाती येण्याची शक्यता आहे.
वेगवेगळ्या सर्व्हेची चर्चा
मतदानानंतर सोशल मीडियावरून निकालाबाबत वेगवेगळे सर्व्हे फिरत आहेत. त्यामुळे बुधवारी दिवसभर या सर्व्हेत नमूद केलेल्या आकडेवारीचीच चर्चा अधिक रंगली होती. महापालिकेत कुणाला स्पष्ट बहुमत मिळणार नाही. त्रिशंकू परिस्थिती निर्माण होऊन काही पक्ष किंगमेकर ठरण्याचीही चर्चा होत होती.