आज होणार लक्ष्मीपूजन
By admin | Published: October 30, 2016 01:25 AM2016-10-30T01:25:55+5:302016-10-30T01:26:22+5:30
जय्यत तयारी : सुख-समृद्धीसाठी करणार प्रार्थना
नाशिक : अंधारातून प्रकाशाकडे नेणारा सण म्हणून दिवाळीतील प्रत्येक सणाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. रविवारी (दि. ३०) दीपावलीतील महत्त्वाचा लक्ष्मीपूजनाचा दिवस असून, शनिवारी शहरातील बाजारपेठेत पूजनाच्या खरेदीसाठी नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. रविवारी मोठ्या उत्साहात आणि पारंपरिक पद्धतीने साजऱ्या करण्यात येणाऱ्या लक्ष्मीपूजनाच्या खरेदीसाठी शहरातील बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात गर्दी होती. लक्ष्मीपूजनाच्या पूजेसाठी लागणारी केरसुणी, साळीच्या लाह्या, झेंडूची फुले, पाच प्रकारची फळे, ऊस, विड्याची पाने, मातीच्या लक्ष्मीची मूर्ती, लक्ष्मीचे फोटो आदि वस्तुंची खरेदी करण्यासाठी महिलावर्गाची बाजारपेठेत गर्दी झाली होती. व्यापारीवर्गाचे लक्ष्मीपूजना पासून नवीन वर्ष सुरू होत असल्याने रोजमेळ, खतावणी, चोपड्या, व्यापारी नोंदी करण्यास सुरुवात करणार आहेत. लक्ष्मीपूजनाला पहाटे लवक र उठून अभ्यंगस्नान करण्यात येते आणि लक्ष्मीपूजनाच्या मुहूर्ताची योग्य वेळ साधून पारंपरिक पद्धतीने लक्ष्मीपूजन करण्यात येणार आहे. लक्ष्मीपूजनाला विशेष महत्त्व असल्याने यावेळी सोने, चांदी आणि मोत्यांचे दागिने, चांदी तसेच सोन्याची नाणी, रोख पैसे आदिंची पूजा करण्यात येते. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी झेंडू, शेवंतीच्या फुलांचे तोरण दरवाजावर लावण्यात येते. (प्रतिनिधी)
लक्ष्मीपूजनासाठी मुहूर्त
लाभ : सकाळी ९.३० ते १०.५६
अमृत : सकाळी १०.५६ ते १२.२२
शुभ : दुपारी ०१.४९ ते ३.१५
शुभ : संध्याकाळी ०६.०५ ते ०७.४०
अमृत : ०७.४० ते ०९. १५