पाणीकपातीबाबत आज तोडगा?
By admin | Published: February 10, 2016 11:24 PM2016-02-10T23:24:55+5:302016-02-10T23:26:08+5:30
सर्वसहमतीचे प्रयत्न : आमदार, गटनेत्यांना निमंत्रण
नाशिक : जलसंपदामंत्र्यांनी महापालिकेला आणखी ३०० दलघफू पाणी वाढवून दिले असले तरी सुमारे २६ दिवस पाणी कमी पडणार असल्याने ही तूट भरून काढण्याविषयी सर्वसहमतीने निर्णय घेण्यासाठी महापौर अशोक मुर्तडक यांनी पुढाकार घेतला असून गुरुवारी दुपारी ४ वाजता शहरातील सर्व आमदार, खासदार तसेच मनपातील गटनेते यांची महापौर दालनात बैठक बोलविण्यात आली आहे.
पाणीकपातीवरून महापालिकेत सरळ सरळ दोन गट पडले असून भाजपा विरुद्ध सत्ताधारी आघाडी असे चित्र दिसून येत आहे. महासभेच्या निर्णयाची अंमलबजावणी न करता महापालिका प्रशासनाने परस्पर छुप्या पद्धतीने ३० टक्के पाणीकपात सुरू केल्याने बुधवारी महापौर-उपमहापौरांसह गटनेत्यांनी पाणीपुरवठा विभागाचे अधीक्षक अभियंता यांना धारेवर धरले होते आणि सदर वाढीव पाणीकपात मागे घेण्याचे महापौरांनी आदेशित केले होते. दरम्यान, जलसंपदामंत्र्यांनी महापालिकेला आणखी ३०० दलघफू पाणी आरक्षण वाढवून दिले असले तरी ५ जुलैपर्यंतच पाणीसाठा पुरेल, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे सुमारे २६ दिवसांची तूट कशी भरून काढायची याबाबत प्रशासनापुढे पेच निर्माण झालेला आहे. पाणीप्रश्नी राजकारण न आणता यावर सर्वमान्य सर्वसहमतीने तोडगा निघावा यासाठी आता महापौर अशोक मुर्तडक यांनी शहरातील सर्व आमदार,नाशिकचे खासदार तसेच मनपातील सर्वपक्षीय गटनेते यांची गुरुवारी दुपारी ४ वाजता महापौरांच्या दालनात बैठक बोलविली आहे. बैठकीत पाणीप्रश्नी वास्तव मांडले जाऊन नेमकी काय भूमिका घ्यायची, यावर तोडगा निघण्याची शक्यता आहे. पाणीकपातीबाबत एकदाचा सोक्षमोक्ष याच बैठकीत व्हावा, अशी अपेक्षा महापौरांनी व्यक्त केली आहे. (प्रतिनिधी)