‘आयमा’च्या अध्यक्षपदाचा आज फैसला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2018 12:52 AM2018-05-30T00:52:15+5:302018-05-30T00:52:15+5:30
आरोप-प्रत्यारोपाने गाजलेल्या आयमाच्या चुरशीच्या निवडणुकीत मंगळवारी अध्यक्षपदाच्या एका पदासाठी झालेल्या मतदानात १५३१ मतदारांपैकी १०४० मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. सायंकाळी शेवटच्या वेळेपर्यंत शांततेत पार पडलेल्या मतदानात एकूण ६८ टक्के मतदान झाले. उद्या (दि. ३०) सकाळी मतमोजणी होणार आहे.
सिडको : आरोप-प्रत्यारोपाने गाजलेल्या आयमाच्या चुरशीच्या निवडणुकीत मंगळवारी अध्यक्षपदाच्या एका पदासाठी झालेल्या मतदानात १५३१ मतदारांपैकी १०४० मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. सायंकाळी शेवटच्या वेळेपर्यंत शांततेत पार पडलेल्या मतदानात एकूण ६८ टक्के मतदान झाले. उद्या (दि. ३०) सकाळी मतमोजणी होणार आहे. उद्योजकांचे नेतृत्व करणाऱ्या अंबड इंडस्ट्रिज अॅण्ड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (आयमा)च्या निवडणुकीत विरोधी एकता गटाने केवळ अध्यक्षपदासाठीच निवडणूक लढविल्याने २६ पैकी २५ जागा या आधीच बिनविरोध झाल्या आहेत. अध्यक्षपदाच्या एका जागेसाठी मंगळवारी (दि.२९) रोजी सकाळी ९ ते सायंकाळी ५ यावेळेत अबंड येथील आयमा रिक्रियेशन सेंटर येथे मतदान शांततेत पार पडले. सकाळी ९ वाजता प्रत्यक्ष मतदानास सुरुवात झाली. अध्यक्षपदासाठी सत्ताधारी एकता पॅनलकडून वरुण तलवार, तर विरोधी एकता पॅनलकडून अध्यक्षपदासाठी तुषार चव्हाण या दोघांमध्ये सरळ लढत असल्याने या निवडणुकीकडे उद्योजकांचे लक्ष लागले आहे. आयमा या संस्थेच्या माजी अध्यक्षांनी मागील निवडणुकीप्रमाणे यंदाची निवडणूकदेखील बिनविरोध व्हावी यासाठी दोन्ही पॅनलच्या गटांची बैठक घेत समझोता करण्याचा प्रयत्न केला, परंतु यास यश न आल्याने अखेरीस निवडणूक घेण्यात आली. सकाळपासून मतदारांचा उत्साह दिसून येत होता. १० वाजेपर्यंत ८० मतदारंनी मतदानाचा हक्क बजावला होता.
यानंतर सकाळी ११ वाजेपर्र्यंत मतदानाचा आकडा हा २०९ इतका झाला होता. यानंतर मतदानासाठी गर्दी होत गेल्याने १२ वाजेपर्यंत ४२९ इतके मतदान झाले होते. दुपारी दोन ते चार दरम्यान उन्हामुळे मतदारांचा ओघ कमी झाला असला तरी तीन वाजेपर्यंत ७८८ इतके मतदान झाले. यानंतर शेवटच्या दोन तासांत मतदानासाठी रांगा लागल्या होत्या. चार वाजेपर्यत ९५० इतके मतदान झाले, तर मतदानाच्या शेवटच्या तासात ९० मतदारांनी आपला मतदानचा हक्क बजावला. सायंकाळी ५ वाजेपर्यंत १५३१ मतदारांंपैकी १०४० मतदारांनी आपला हक्क बजावला. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून डी. जी. जोशी, सी. डी. कुलकर्णी, मधुकर ब्राह्मणकर यांनी काम पाहिले. अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांच्या मार्गदर्शनाखाली चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.