जिल्हा सहकारी बॅँकांच्या पीककर्जाचा आज फैसला
By admin | Published: June 3, 2017 01:30 AM2017-06-03T01:30:52+5:302017-06-03T01:31:05+5:30
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकाचे अध्यक्ष व कार्यकारी संचालक यांची बैठक मुंबईला सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या उपस्थितीत बैठक आयोजित करण्यात आली आहे
लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : तोंडावर आलेल्या खरीप हंगामासाठी सभासद शेतकऱ्यांना पीककर्ज वाटपास राज्यातील बहुतांश जिल्हा बॅँकांनी असमर्थतता दर्शविल्याचे वृत्त असून, त्यावर तोडगा काढण्यासाठी उद्या
(दि. ३) शनिवारी राज्यातील सर्व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकाचे अध्यक्ष व कार्यकारी संचालक यांची तातडीची बैठक मुंबईला सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या उपस्थितीत बैठकीचे आयोजन करण्यात आल्याची माहिती जिल्हा बॅँकेचे अध्यक्ष नरेंद्र दराडे यांनी दिली.
दरम्यान, या तातडीच्या बैठकीस अध्यक्ष नरेंद्र दराडे यांच्याऐवजी जिल्हा बॅँकेचे अनुभवी संचालक तथा प्रवक्ते परवेज कोकरी व प्रभारी कार्यकारी संचालक विलास बोरस्ते उपस्थित राहणार आहेत.
राज्यातील सर्व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकांचे अध्यक्ष व कार्यकारी संचालकांची राज्य शिखर बॅँकेच्या सभागृहात शनिवारी सकाळी साडेदहा वाजता ही बैठक आयोजित करण्यात आली आहे. सहकारमंत्री सुभाष देशमुख आगामी खरीप पीककर्ज वाटपाचा आढावा घेऊन जिल्हा बॅँकांपुढील खरीप हंगामात पीक कर्ज वाटप करण्याबाबत येत असलेल्या अडचणी व समस्यांची माहिती घेणार आहे.