५९ उमेदवारांच्या भवितव्याचा आज फैसला

By admin | Published: February 20, 2017 11:38 PM2017-02-20T23:38:59+5:302017-02-20T23:39:17+5:30

सिन्नर : १३९६ कर्मचारी नियुक्त; शासकीय यंत्रणा सज्ज

Today's decision of the future of 59 candidates is decided | ५९ उमेदवारांच्या भवितव्याचा आज फैसला

५९ उमेदवारांच्या भवितव्याचा आज फैसला

Next

सिन्नर : जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी मंगळवार, दि. २१ रोजी मतदान होत आहे. जिल्हा परिषदेच्या ६ जागांसाठी १८, तर  पंचायत समितीच्या १२ जागांसाठी ४१ उमेदवार रिंगणात असून, त्यांचे राजकीय भवितव्य मतदानयंत्रांत बंद होणार आहे.  मंगळवारी होणाऱ्या मतदानासाठी शासकीय यंत्रणा सज्ज झाली असून, सोमवारी दुपारी मतदान अधिकारी व कर्मचारी मतदानयंत्रे व इतर  साहित्य घेऊन आपापल्या मतदान केंद्रांकडे  रवाना झाले. सिन्नर तालुक्यात २१३ मतदान केंद्र आहेत. जिल्हा परिषदेच्या ६, तर पंचायत समितीच्या १२ गणांसाठी तालुक्यातील एक लाख ९७ हजार ६२० मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. त्यात एक लाख चार हजार ३२१ पुरुष, तर ९३ हजार २९९ महिला मतदारांचा समावेश आहे.  मतदानासाठी बाहेर पडताना ओळखपत्र बाळगणे आवश्यक असल्याचे आवाहन करण्यात आले आहे. भाजपा, शिवसेना यांनी संपूर्ण जागेवर स्वतंत्र उमेदवार उभे केले आहेत. तर कॉँग्रेस-राष्ट्रवादीने जिल्हा परिषदेच्या ३ जागांवर उमेदवार दिले आहेत. मनसेने एका गटासाठी उमेदवार दिला आहे. मतदानासाठी १२६४ कर्मचारी असून, १३२ राखीव कर्मचारी आहेत. एकूण १३९६ कर्मचारी निवडणूक कामासाठी सज्ज झाले आहेत.
प्रत्येक १२ गणांसाठी स्वतंत्र क्षेत्रीय अधिकारी असणार आहेत. प्रत्येक मतदान  केंद्रावर एक मतदान केंद्राध्यक्ष, तीन मतदान अधिकारी, व एक शिपाई असे पाच  कर्मचारी असणार आहेत. तर कमी  मतदान असणाऱ्या १४ केंद्रांवर प्रत्येकी तीन कर्मचारी असणार आहेत. मतदानाची वेळ सकाळी साडेसात तर सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत असणार आहे. सोमवारी सकाळी तहसील कार्यालयाच्या प्रांगणात निवडणूक कर्मचाऱ्यांना अंतिम प्रशिक्षण देण्यात आले. त्यानंतर बस, जीप या वाहनांद्वारे कर्मचारी मतदानयंत्रे घेऊन नेमून दिलेल्या मतदान केंद्रांकडे रवाना झाले. (वार्ताहर)

Web Title: Today's decision of the future of 59 candidates is decided

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.