कोरोनासंदर्भातील कडक निर्बंधांबाबत आज निर्णय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2021 04:16 AM2021-03-26T04:16:04+5:302021-03-26T04:16:04+5:30
शुक्रवारी सकाळी ११ वाजता पालकमंत्री बैठक घेणार आहेत. जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त, पोलीस आयुक्त, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यासह ...
शुक्रवारी सकाळी ११ वाजता पालकमंत्री बैठक घेणार आहेत. जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त, पोलीस आयुक्त, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यासह आरोग्य खात्याचे वरिष्ठ अधिकारी बैठकीस उपस्थित राहणार आहेत. यावेळी नाशिक शहर, जिल्हा आणि मालेगाव येथील बाधितांची संख्या, उपचार पद्धती, शासकीय आणखी खासगी रुग्णालयातील बेडसची उपलब्धता आणि चाचण्या या सर्वच बाबतीत आढावा घेतला जाणार आहे.
गेल्या वर्षी कोरोनाचे संकट आल्यानंतर आता नोव्हेंबरमध्ये रुग्णसंख्या कमी झाली आणि कोरोना नियंत्रणात आल्याचे दिसत होते. मात्र, त्यानंतर फेब्रुवारी महिन्यात पुन्हा कोराेना वाढला आहे. मार्च महिन्यात तर गेल्यावर्षी जुलै, सप्टेंबर महिन्यात आढळणाऱ्या रुग्णसंख्येप्रमाणेच उच्चांकी संख्येने आढळत आहेत. त्यामुळे नाशिकमध्ये चिंतेचे वातावरण आहे.
यापूर्वीच पोलीस आयुक्तांनी रात्र संचारबंदी केली त्यानंतर आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेने जिल्ह्यातील दुकाने सायंकाळी ७ वाजेपर्यंतच खुली ठेवण्यास मुभा दिली आहे. याशिवाय शनिवार व रविवार बाजारपेठादेखील बंद ठेवण्यात आल्या आहेत. शाळा-महाविद्यालये तर ३१ मार्चपर्यंत बंद आहेत. अशावेळी पालकमंत्री छगन भुजबळ घेत असलेल्या आढावा बैठकीत काय निर्णय घेतात याकडे जिल्ह्याचे लक्ष लागून आहे.