सानुग्रह अनुदानाचा आज निर्णय
By Admin | Published: October 15, 2016 02:36 AM2016-10-15T02:36:22+5:302016-10-15T02:50:43+5:30
महापालिका : महापौरांच्या दालनात होणार बैठक
नाशिक : दिवाळीचा सण अवघ्या दहा दिवसांवर येऊन ठेपला असताना अद्यापही महापालिका कर्मचाऱ्यांना देण्यात येणाऱ्या सानुग्रह अनुदानाचा निर्णय झाला नसल्याबद्दल महासभेत शिवसेनेने आक्रमक भूमिका घेतली. यावेळी महापौर अशोक मुर्तडक यांनी सर्वपक्षीय गटनेते, प्रशासन आणि कामगार संघटनांचे पदाधिकारी यांची संयुक्त बैठक शनिवारी (दि. १५) सकाळी ११ वाजता घेण्याचे जाहीर केले. त्यामुळे शनिवारी सानुग्रह अनुदानावर निर्णय होण्याची शक्यता आहे.
मनपाच्या महासभेत सुरुवातीलाच शिवसेनेचे माजी महापौर विनायक पांडे यांनी मनपा कर्मचाऱ्यांच्या सानुग्रह अनुदानाचा प्रश्न उपस्थित केला आणि त्याबाबत तातडीने निर्णय घेण्याचा आग्रह धरला. यावेळी महापौरांनी सदर विषयावर नंतर चर्चा करू अगोदर विषयपत्रिकेनुसार कामकाज चालवू असे सांगत सभा पुढे नेण्याचा प्रयत्न केला. परंतु, शिवसेनेचे सर्वच सदस्यांनी उभे राहून सानुग्रह अनुदानप्रकरणी आक्रमक पवित्रा घेतला. त्यामुळे महापौर व सेना नगरसेवक यांच्यात शाब्दिक बोलाचालीही झाली. कर्मचाऱ्यांच्या सानुग्रह अनुदानाच्या विषयाबाबत युनियन पदाधिकारी व प्रशासन यांच्यात चर्चा झाली असून, फक्त किती रक्कम द्यायची यावरच निर्णय बाकी असल्याचा खुलासा महापौरांनी केला. सेनेचे पदाधिकारी ऐकण्याच्या मन:स्थितीत नव्हते. अखेर महापौरांनी याबाबत शनिवारी (दि. १५) सकाळी ११ वाजता बैठक घेण्याचे जाहीर केले. यावेळी प्रकाश लोंढे यांनी कर्मचाऱ्यांना देण्यात येणाऱ्या गणवेशाचाही मुद्दा उपस्थित केला. त्यावर महापौरांनी ठराव मंजूर करून प्रशासनाकडे रवाना केल्याचे सांगितले.