वाहतूक कोंडीचा आज फैसला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2018 01:10 AM2018-12-17T01:10:27+5:302018-12-17T01:10:49+5:30
शहरातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी महापालिकेच्या वतीने गठीत करण्यात आलेल्या मोबिलिटी सेलची बैठक सोमवारी (दि. १७) होणार असून, या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले जाण्याची शक्यता आहे.
नाशिक : शहरातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी महापालिकेच्या वतीने गठीत करण्यात आलेल्या मोबिलिटी सेलची बैठक सोमवारी (दि. १७) होणार असून, या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले जाण्याची शक्यता आहे. विशेषत: शहरातील वाहनतळाचा प्रश्न सोडवण्यासाठी आॅनस्ट्रिट आणि आॅफस्ट्रिट पार्किंग तयार करण्याचा निर्णय होणार असून, शहरात अवजड वाहनांना मनाई करण्याचा प्रस्तावदेखील मांडण्यात आला आहे.
आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी ही बैठक महापालिकेच्या मुख्यालयात बोलावली आहे या मोबिलिटी सेलमध्ये महापालिकेच्या अधिकाऱ्यांना बरोबरच पोलीस अधिकारी, आरटीओ तसेच अन्य शासकीय यंत्रणांचे प्रतिनिधी आणि सेवाभावी संस्थांचे प्रतिनिधी यांना निमंत्रित करण्यात आले आहे. गेल्या काही वर्षांपासून नाशिक शहरातील वाहतुकीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
विविध मार्गांवर आणि चौकात होणाºया वाहतूक कोंडीबरोबर शहरात पुरेसे वाहनतळ नसल्याने वाहने उभी करावीत हा प्रश्न असतो, त्यातच रस्त्यात कुठेही वाहने उभी केली तर पोलिसांच्या वतीने वाहनचालकांवर कारवाई करण्यात येते. त्यामुळे शहरात आॅनस्ट्रिट आणि आॅफस्ट्रिट पार्किंग सुरू करण्यासाठी प्रस्ताव आहे. त्यावर या बैठकीत निर्णय होण्याची शक्यता आहे. सध्या स्मार्ट सिटी अंतर्गत ३३ ठिकाणी ई-पार्किंगचे नियोजन आहे. परंतु अनेक भागात अशाप्रकारे ई-पार्किंगदेखील नाही बाजारपेठांमध्ये ही अडचण जाणवत असते, त्या पार्श्वभूमीवर वाहनतळ उभारणीचा महत्त्वाचा निर्णय होण्याची शक्यता आहे.
याशिवाय स्मार्ट सिटी अंतर्गत प्रोजेक्ट गोदा राबविण्यात येणार आहे .त्यातील सर्वांत महत्त्वाचे पहिल्या टप्प्यातील काम रामवाडी पूल ते होळकर पूल यादरम्यान होणार आहे. या कामामुळे परिसरातील वाहतुकीला अडथळा निर्माण होण्याची शक्यता आहे त्या पार्श्वभूमीवर वाहतुकीचे नियोजन करण्याबाबतदेखील या बैठकीत निर्णय घेण्यात येणार आहे. प्रोजेक्ट् गोदा अंतर्गत सध्या रामकुंडाजवळ असलेले वाहनतळ टाळकुटे मंदिराजवळ स्थलांतरित करण्याचा प्रस्ताव आहे. त्याबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे. शहरातील विविध ठिकाणी असलेल्या वाहतूक बेटांचे तसेच दुभाजकांची सुशोभीकरण याबाबतदेखील बैठकीत निर्णय घेण्यात येणार आहे.
पाच ठिकाणी सिग्नल
शहरात पाच ठिकाणी तातडीने सिग्नल उभारण्याबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे. या बैठकीत बीवायके कॉलेजजवळील टी. ए.कुलकर्णी चौक, सातपूर येथील पपया नर्सरी, नाशिकरोड येथील विहितगाव चौक, गोविंदनगर येथे कर्मयोगी चौक, शरणपूररोडवरील एचडीएफसी बँक आशा पाच ठिकाणी सिग्नल सुरू करण्याचा प्रस्ताव आहे.
अपघात प्रवण क्षेत्रांचा अभ्यास
४नाशिक शहरात ज्या ज्या ठिकाणी सतत अपघात होतात अशा अपघातप्रवण क्षेत्रांचा अभ्यास करून त्यावर उपाययोजना करण्याचे शासनाचे आदेश असून, त्यावरदेखील बैठकीत निर्णय होणे शक्य आहे.