‘जनस्थान’ पुरस्काराचा आज वितरण सोहळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2019 01:08 AM2019-02-27T01:08:39+5:302019-02-27T01:09:08+5:30
येथील कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या वतीने ज्ञानपीठाच्या धर्तीवर केवळ मराठीतील सृजनशील साहित्यिकासाठी एक वर्षाआड दिला जाणारा ‘जनस्थान’ पुरस्काराचा वितरण सोहळा बुधवारी (दि.२७) सायंकाळी ६ वाजता महाकवी कालिदास कलामंदिरात आयोजित करण्यात आला आहे. यावर्षी ज्येष्ठ कवी, कांदबरीकार आणि समीक्षक वसंत आबाजी डहाके यांना जनस्थान घोषित झाला आहे.
नाशिक : येथील कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या वतीने ज्ञानपीठाच्या धर्तीवर केवळ मराठीतील सृजनशील साहित्यिकासाठी एक वर्षाआड दिला जाणारा ‘जनस्थान’ पुरस्काराचा वितरण सोहळा बुधवारी (दि.२७) सायंकाळी ६ वाजता महाकवी कालिदास कलामंदिरात आयोजित करण्यात आला आहे. यावर्षी ज्येष्ठ कवी, कांदबरीकार आणि समीक्षक वसंत आबाजी डहाके यांना जनस्थान घोषित झाला आहे.
कुुसुमाग्रज प्रतिष्ठानचे अध्यक्ष मधु मंगेश कर्णिक यांच्या हस्ते डहाके यांना जनस्थान प्रदान केला जाणार आहे. नाशिककरांचा दरवर्षी आकर्षणबिंदू राहिलेल्या जनस्थान पुरस्कार वितरण सोहळ्याची तयारी पूर्ण झाली असून, मंगळवारी (दि.२६) सायंकाळी डहाके हे पत्नी ज्येष्ठ साहित्यिक प्रभा गणोरकर यांच्यासमवेत नाशिकमध्ये दाखल झाले आहेत. पुरस्कार वितरण सोहळ्यात वसंत डहाके यांच्याविषयी साहित्यिक संजय भास्कर जोशी आपले मनोगत व्यक्त करणार आहेत. सोहळ्याचा प्रारंभ कुसुमाग्रजांच्या ‘प्रकाशदाता जीवनदाता’ या सूर्यप्रार्थनेने होणार आहे. मकरंद हिंगणे यांच्या संगीत दिग्दर्शनाखाली आनंद अत्रे, सुखदा दीक्षित, हर्षद गोळेसर, हर्षद वडजे, श्रुती बोराडे, समृद्धी गांगुर्डे आणि मोहीत शिंदे हे विद्यार्थी ही कविता सादर करणार आहेत. कालिदास कलामंदिराच्या आवारात आजवर जनस्थानप्राप्त सारस्वतांची स्केचेस मांडली जाणार असल्याची माहिती प्रतिष्ठानचे कार्यवाह मकरंद हिंगणे यांनी दिली. दरम्यान, वसंत आबाजी डहाके हे पुरस्कार वितरण सोहळ्यापूर्वी टिळकवाडीतील तात्यासाहेबांच्या निवासस्थानी तसेच गंगापूररोडवरील कुसुमाग्रज स्मारकात भेट देणार आहेत.
मागील महिन्यातच कुसुमाग्रज प्रतिष्ठानने वसंत आबाजी डहाके यांची जनस्थान पुरस्कारासाठी घोषणा केली होती. एक लाख रुपये, ब्रॉँझची सूर्यमूर्ती आणि सन्मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
उद्यापासून स्मरणयात्रा
कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या वतीने दि. २८ फेबु्रवारी ते १० मार्चपर्यंत कुसुमाग्रज स्मारकात ‘स्मरणयात्रा’ अंतर्गत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यात आकाश एस. यांचे बासरीवादन, मानसकुमार यांचे व्हायोलीनवादन, जनस्थान पुरस्कारप्राप्त कवींच्या कवितांचे सादरीकरण, अभिनव कल्याण यांचे ‘गस्त’ नाटक, मराठी साहित्य संमेलन, श्रिया सोंडूर यांचे शास्त्रीय व उपशास्त्रीय गायन, पु. ल. देशपांडे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त गुळाचा गणपती हा चित्रपट, पवार तबला अकादमी यांचे समूह तबलावादन, सोनाली नवांगुळ यांचे ‘मी ठरवलं तर’ या विषयावर व्याख्यान, सतीश कोठेकर दिग्दर्शित ‘सूर्याच्या अंतिम किरणापासून सूर्याच्या प्रथम किरणापर्यंत’ नाटक, कीर्ती कलामंदिर यांच्या वतीने कुसुमाग्रजांच्या कवितांचा नृत्याविष्कार ‘रसयात्रा’ आदी कार्यक्रमांचा समावेश आहे.