जिल्हा बॅँक अध्यक्षांची आज निवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2017 12:48 AM2017-12-23T00:48:35+5:302017-12-23T00:49:09+5:30
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष-पदासाठी शनिवारी निवडणूक होत असून, या पदासाठी इच्छुक असलेल्यांना रात्री उशिरापर्यंत पालकमंत्र्यांकडून कोणताही ‘निरोप’ न आल्याने त्यांची घालमेल कायम आहे. शनिवारी अध्यक्षपदाच्या उमेदवारीसाठी नामांकन भरण्यापूर्वी नाव निश्चित होण्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली आहे.
नाशिक : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष-पदासाठी शनिवारी निवडणूक होत असून, या पदासाठी इच्छुक असलेल्यांना रात्री उशिरापर्यंत पालकमंत्र्यांकडून कोणताही ‘निरोप’ न आल्याने त्यांची घालमेल कायम आहे. शनिवारी अध्यक्षपदाच्या उमेदवारीसाठी नामांकन भरण्यापूर्वी नाव निश्चित होण्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली आहे. जिल्हा उपनिबंधक नीळकंठ कºहे यांची निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. सकाळी ११ ते साडेअकरापर्यंत उमेदवारांना नामांकन भरण्याची
वेळ देण्यात आली असून, त्यानंतर छाननी व माघारीनंतर थेट निवडणूक घेण्यात येणार आहे. जिल्हा बॅँकेचे अध्यक्षपद भारतीय जनता पार्टीकडे असावे यासाठी पार्टीच्या इच्छुकांनी जोरदार फिल्डिंग लावली आहे. गेली अडीच वर्षे जिल्हा बॅँकेचे अध्यक्ष व उपाध्यक्षपद शिवसेनेकडे असल्यामुळे येणाºया कालावधीत भाजपाकडे हे पद असावे असा आग्रह पक्षश्रेष्ठींकडे धरण्यात आल्यामुळे भाजपात इच्छुकांची संख्या अधिक आहे. खुद्द खासदार हरिश्चंद्र चव्हाण, आमदार सीमा हिरे यांच्यासह माणिकराव कोकाटे, केदा अहेर, परवेज कोकणी यांची नावे अधिक चर्चेत असली तरी, त्यातही कोकाटे, अहेर, कोकणी यांच्यातच खरी चुरस निर्माण झाली आहे. दोन दिवसांपूर्वी उमेदवार ठरविण्याचे अधिकार पालकमंत्री गिरीश महाजन यांना देण्यात आल्यामुळे आता त्यांच्यावरच सारी मदार आहे. शनिवारी सकाळी पालकमंत्र्यांकडून उमेदवाराचे नाव जाहीर होणार आहे. दुसरीकडे शिवसेनेने जिल्हा बॅँकेच्या अध्यक्ष व उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या भानगडीत न पडण्याचा निर्णय घेतल्यामुळे जिल्हा बॅँकेची निवडणूक बिनविरोध पार पडण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. सध्याची बॅँकेची अवस्था पाहता, शेतकरी हितासाठी बॅँक वाचावी ही शिवसेनेची भूमिका असल्याने अध्यक्ष व उपाध्यक्षपदासाठी सेना इच्छुक नसल्याचे माजी उपाध्यक्ष सुहास कांदे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. दरम्यान, जिल्हा बॅँकेच्या संचालकांची रात्री उशिरा अज्ञातस्थळी बैठक होऊन त्यात शनिवारची व्यूहरचना आखण्यात आली आहे.