जिल्ह्यातील पाच नगराध्यक्षांची आज निवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2018 01:14 AM2018-05-30T01:14:06+5:302018-05-30T01:14:29+5:30
नाशिक : जिल्ह्यातील पाच नगर पंचायतींच्या नगराध्यक्ष निवडीसाठी बुधवारी (दि. ३०) रोजी निवडणूक होत आहे. निफाड येथील भाजपा उमेदवाराच्या नामनिर्देशन पत्राविषयी शिवसेना नगरसेवकांनी महसूल आयुक्तांकडे अपील दाखल केल्याने या अपिलाच्या निकालाकडे संपूर्ण निफाडकरांचे लक्ष लागले आहे. कळवण नगरपंचायतच्या नगराध्यक्ष-पदासाठी काँग्रेसकडून माजी आमदार अॅड. काशीनाथ बहीरम यांचे सुपूत्र मयुर बहीरम व भाजपकडून नगरसेविका सौ सुरेखा जगताप या दोघांमध्ये लढत होत असून काँग्रेसच्या सौ रोहीणी महाले यांनी मंगळवारी नामनिर्देशनपत्र मागे घेतल्याने नगराध्यक्षपदासाठी काँग्रेस व भाजप यांच्यात आमने सामने दुरंगी लढत होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीने काँग्रेसच्या मयुर बहीरम यांच्या नावाला हिरवा कंदील दिला असून भाजपकडे बहुमत नसतांनौ सुरेखा जगताप या नगराध्यक्ष निवडणुकीला सामोरे जात असल्याने चमत्कार होतो की काय याकडे कळवणकरांचे लक्ष लागले आहे. निफाड नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदासाठी भाजपाचे एकनाथ तळवाडे यांनी दाखल केलेले नामनिर्देशपत्र रद्द करावे यासाठी शिवसेना नगरसेवकांनी आयुक्त कार्यालयात अपील दाखल केल्याने या निवडणुकीकडे निफाडकरांचे लक्ष लागले आहे. या अपीलावर बुधवारी सकाळी ११.३० वा आयुक्तालय कार्यालयात सुनावणी होत असून या निकालावर नगराध्यक्षपद निवडीचे भवितव्य अवलंबून आहे .
दरम्यान या निवडणुकीत भाजप व आघाडीकडे १० नगरसेवक आहेत, तर सेनेकडे ६ नगरसेवक आहेत. त्यामुळे या पदावर भाजपचे एकनाथ तळवाडे यांची निवड निश्चित मानली जात आहे . देवळा नगरपंचायत नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी विद्यमान नगराध्यक्षा जोत्स्ना संजय अहेर यांचा एकमेव उमेदवारी अर्ज दाखल झाल्याने त्यांची पुढील कालावधीसाठी नगराध्यक्षा म्हणून निवड निश्चित झाली आहे. पेठच्या नगराध्यपदाच्या निवडणुकीत माघारीच्या अखेरच्या दिवशी सत्ताधारी गटासह विरोधी गटातील उमेदवारांनी माघार घेतल्याने विद्यमान उपनगराध्यक्ष मनोज घोंगे यांचा नगराध्यक्षपदाचा मार्ग मोकळा झाला आहे. चांदवड नगरपरिषदेच्या नगराध्यक्षपदासाठी नगरसेवक रेखा गवळी यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने त्यांची निवड निश्चित मानली जात आहे विद्यमान नगराध्यक्ष भूषण कासलीवाल यांचा अडीच वर्षाचा कार्यकाळ संपल्याने अनुसूचित जमाती महिला राखीव असलेल्या नगराध्यक्षपदासाठी निवडणूक कार्यक्र म जाहीर झाला मालेगावच्या तहसीलदार ज्योती देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणूक प्रक्रि या राबविण्यात येणार आहे.
पदाधिकाऱ्यांचा कार्यकाळ आज संपणार
कळवण, निफाड, देवळा, चांदवड आणि पेठ या पाच नगर पंचायतींच्या नगराध्यक्षांचा अडीच वर्षांचा कार्यकाळ बुधवारी (दि. ३० ) रोजी संपत असल्याने नूतन नगराध्यक्ष निवडीसाठी जिल्हाधिकाºयांनी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. नगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्षांचीही आज निवड करण्यात येणार आहे. नगराध्यक्षपदासाठी २५ मे रोजी अर्ज दाखल करण्यात आले आहेत.