आजपासून साहित्यिक मेळावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2017 12:12 AM2017-09-23T00:12:20+5:302017-09-23T00:12:25+5:30
१७७ वर्षांची प्रदीर्घ परंपरा आणि सांस्कृतिक क्षेत्राचा मानबिंदू असलेल्या सार्वजनिक वाचनालयाच्या ५०व्या सुवर्ण महोत्सवी जिल्हा साहित्यिक मेळाव्याचे शनिवार (दि. २३)पासून आयोजन करण्यात आले असून, ग्रंथदिंडीने या मेळाव्याचे उद्घाटन होणार आहे.
नाशिक : १७७ वर्षांची प्रदीर्घ परंपरा आणि सांस्कृतिक क्षेत्राचा मानबिंदू असलेल्या सार्वजनिक वाचनालयाच्या ५०व्या सुवर्ण महोत्सवी जिल्हा साहित्यिक मेळाव्याचे शनिवार (दि. २३)पासून आयोजन करण्यात आले असून, ग्रंथदिंडीने या मेळाव्याचे उद्घाटन होणार आहे. सकाळी ९ वाजता टिळकवाडी येथील कविश्रेष्ठ कुसुमाग्रज यांच्या निवासस्थानापासून ग्रंथदिंडीने या सोहळ्यास सुरुवात होणार असून, या ग्रंथदिंडीत शहरातील १३ शाळेतील हजारांहून अधिक विद्यार्थ्यांसह चित्ररथ, ढोलपथक, लेजीम पथक, ध्वज पथक आदींचा समावेश असणार आहे. परशुराम साईखेडकर येथे ग्रंथदिंडीचा समारोप झाल्यानंतर सकाळी ११ वाजता साहित्यिक मेळाव्याचे सिनेअभिनेते तथा नाम फाउंडेशनचे मकरंद अनासपुरे यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. उद्घाटनाप्रसंगी जिल्हा साहित्यिक मेळाव्याच्या माजी अध्यक्षांना मान्यवरांच्या उपस्थितीत सन्मानित करण्यात येणार आहे. दुपारच्या सत्रात २ वाजता ‘नाटक : काल आज आणि उद्या’, तर तीन वाजता ‘कवितेचे अंतरंग’ या विषयावरील परिसंवाद रंगणार आहे. साहित्य मेळाव्याचे अध्यक्ष नाट्य लेखक दत्ता पाटील यांचा आतापर्यंतचा जीवनपट उलगडून सांगणाºया ध्वनी चित्रफितीचे संध्याकाळी साडेचार वाजता सादरीकरण करण्यात येणार असून, खुल्या साहित्य संमेलनाने साहित्य मेळाव्याच्या पहिल्या दिवसाच्या कार्यक्रमांचा समारोप होणार आहे. रविवारी (दि. २४) साहित्यिक मेळाव्याच्या दुसºया दिवशी सकाळी १० वाजता मेळाव्याचे अध्यक्ष दत्ता पाटील यांचे बीजभाषण होणार असून, सकाळी ११ वाजता ‘समाज माध्यमांचे साहित्यावर होणारे परिणाम’ या विषयावरील परिसंवाद होणार आहे.
मेळाव्याच्या दुसºया दिवशी सावानातर्फे घेण्यात आलेल्या विविध स्पर्धेतील विजेत्यांना सन्मानित करण्यात येणार आहे तसेच रविवारी संध्याकाळी ज्येष्ठ साहित्यिक चंद्रकांत महामिने यांना ज्येष्ठ भाषातज्ज्ञ डॉ. गणेश देवी यांच्या हस्ते सन्मानित करून सुवर्ण महोत्सवी साहित्यिक मेळाव्याचा समारोप होणार आहे. सावानाच्या सुवर्ण महोत्सवी जिल्हा साहित्यिक मेळाव्यास उपस्थित राहणाºया श्रोत्यांना सावानातर्फे विशेष सन्मानचिन्ह देण्यात येणार असल्याची माहिती सावानाचे प्रमुख सचिव श्रीकांत बेणी यांनी दिली. दोन दिवस चालणाºया या साहित्यिक मेळाव्यात अधिकाधिक नागरिकांनी सहभागी होण्याचे आवाहन सार्वजनिक वाचनालयातर्फे करण्यात आले आहे.