महंतांच्या कोपशांतीसाठी आज बैठक ‘विधी’ नाराजी दूर करणार : नव्या जिल्हाधिकाऱ्यांची सत्वपरीक्षा
By admin | Published: February 10, 2015 01:43 AM2015-02-10T01:43:07+5:302015-02-10T01:43:09+5:30
महंतांच्या कोपशांतीसाठी आज बैठक ‘विधी’ नाराजी दूर करणार : नव्या जिल्हाधिकाऱ्यांची सत्वपरीक्षा
नाशिक : कुंभमेळ्यात शैव पंथीयांच्या शाहीस्नानाच्या जागेवर म्हणजेच त्र्यंबकक्षेत्रास दुय्यम वागणूक मिळत असल्याने साधू-महंत कोपले आणि फडणवीस सरकारला दुषणे दिली. त्यामुळे प्रशासनाची धावपळ उडाली असून, महंतांचा कोप कमी करण्यासाठी मंगळवारी त्र्यंबकेश्वरला बैठक विधी होणार आहे. विविध आखाड्यांच्या महंतांना निमंत्रित करून विश्वासात घेतले जाणार असल्याचे वृत्त आहे. नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे कुंभमेळ्यासाठी २३७८ कोटी रुपयांचा आराखडा तयार करण्यात आला आहे, परंतु अवघ्या दहा कोटी रुपयांची कामेही त्र्यंबकेश्वरी सुरू नाही. त्यामुळे येथील आखाड्यांच्या महंतांनी संताप व्यक्त केला आहे. रविवारी अखिल भारतीर दर्शन आखाडा परीषदेचे अध्यक्ष महंत सागरानंद आणि श्री निरंजनी आखाड्याचे सचिव नरेंद्रगिरी महाराज यांनी नाशिकमध्ये पत्रकार परिषद घेतली आणि सारा रोष मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर व्यक्त केला. गोदावरी नदीच्या प्रदूषणाचा मुद्दाही त्यांनी उपस्थित केला आणि अशा प्रदूषित नदीत कुंभमेळा कसा पार पडणार असा प्रश्न केला. शैव महंतांच्या या कोपवाणीने प्रशासन भयभीत झाले असावे त्यांनी तातडीने मंगळवारी सकाळी साडेदहा वाजता त्र्यंबकेश्वर येथे बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीस सर्व आखाड्यांच्या महंतांना बोलविण्यात आले आहे. प्रशासनाच्या वतीने विभागीय आयुक्त एकनाथ डवले आणि नवे जिल्हाधिकारी दीपेंद्रसिंह कुशवाह हे उपस्थित राहणार आहे. नाशिकमध्ये बदलून आल्यानंतर कुशवाह यांची ही पहिलीच बैठक असून, त्यामुळेच त्यांची सत्वपरीक्षाच ठरणार आहे. दुपारी तीन वाजताही जिल्हाधिकारी कुशवाह हे कुंभमेळ्याची साप्ताहिक बैठक घेणार आहेत. (प्रतिनिधी)