जिल्हा दूध संघासाठी आज मतदान
By admin | Published: June 28, 2015 01:28 AM2015-06-28T01:28:27+5:302015-06-28T01:28:51+5:30
जिल्हा दूध संघासाठी आज मतदान
नाशिक : जिल्हा दूध उत्पादक संघाच्या १२ जागांसाठी उद्या (दि.२८) रविवारी मतदान होत आहे. केवळ १७७ मतदार असल्याने उमेदवारांची मते आपल्याकडे फिरविण्यासाठी चांगलीच धावपळ उडाली आहे. मतदान झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी म्हणजे सोमवारी (दि.२९) मतमोजणी होणार आहे. माजी आमदार माणिकराव कोकाटे यांच्या नेतृत्वाखालील शेतकरी विकास पॅनल, तर माजी जिल्हा परिषद अध्यक्ष पंढरीनाथ थोेरे यांच्या नेतृत्वाखालील प्रगती पॅनलमध्येच खरी लढत होणार आहे. नाशिक जिल्हा दूध उत्पादक संघाची पंचवार्षिक निवडणूक २२ मे रोजी घोषित झाली होती. त्यानंतर अनेक इच्छुकांनी अर्ज खरेदी केले होते. दूध संघासाठी एकूण १५ जागा असून, सर्वसाधारण गटातून कळवण येथील योगेश पगार आणि मालेगाव येथील विनोद चव्हाण हे अविरोध निवडून आले आहे. तर राखीव गटासाठी पाच जागा असून, त्यातील अनुसूचित जाती वर्गातून शिवाजी नंदू बोराडे हे अविरोध निवडून आले आहेत. त्यामुळे आता १२ जागांसाठी एकूण २९ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. रविवारी सकाळी ८ वाजेपासून येथील गंगापूररोडवरील मराठा विद्यालयात मतदान होणार असून, सायंकाळी चार वाजेपर्यंत मतदानाची वेळ आहे. २९ जून रोजी सोमवारी द्वारका येथील स्वामी समर्थ मंगल कार्यालयात सकाळी ८ वाजेपासून मतमोजणीस सुरुवात होईल. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून जे. एम. पगार हे काम पाहत आहेत. (प्रतिनिधी)