नाशिक, दिंडोरी मतदारसंघांसाठी आज मतदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2019 01:06 AM2019-04-29T01:06:28+5:302019-04-29T01:07:09+5:30
लोकसभेच्या नाशिक व दिंडोरी या दोन मतदारसंघांबरोबरच धुळे मतदारसंघातील मालेगाव मध्य, मालेगाव बाह्य व बागलाण या तीन विधानसभा मतदारसंघांत सोमवारी (दि.२९) मतदान घेण्यात येणार असून, त्यासाठी ४७२० मतदान केंद्रे सज्ज ठेवण्यात आली आहेत.
नाशिक : लोकसभेच्या नाशिक व दिंडोरी या दोन मतदारसंघांबरोबरच धुळे मतदारसंघातील मालेगाव मध्य, मालेगाव बाह्य व बागलाण या तीन विधानसभा मतदारसंघांत सोमवारी (दि.२९) मतदान घेण्यात येणार असून, त्यासाठी ४७२० मतदान केंद्रे सज्ज ठेवण्यात आली आहेत. या निवडणुकीसाठी ४५ लाखांहून अधिक मतदार मतदानाचा हक्क बजावतील. मतदान निर्भयपणे पार पाडण्यासाठी सर्वत्र चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
देशात होत असलेल्या लोकसभेच्या निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात नाशिक जिल्ह्यातील नाशिक व दिंडोरी मतदारसंघांचा समावेश करण्यात आला आहे. त्यासाठी २ एप्रिलपासून नामांकन दाखल करण्यात आले. नाशिक मतदारसंघासाठी शिवसेनेचे खासदार हेमंत गोडसे, राष्टÑवादीचे समीर भुजबळ, बहुजन वंचित आघाडीचे पवन पवार, अपक्ष माणिकराव कोकाटे, वैभव अहिरे, सोनिया जावळे, विनोद शिरसाठ, शिवनाथ कासार, संजय घोडके, शरद आहेर, प्रकाश कनोजे, सिंधुबाई केदार, देवीदास सरकटे, धनंजय भावसार, प्रियंका शिरोळे, विलास मधुकर देसले, शरद धनराव व सुधीर देशमुख हे अठरा उमेदवार भवितव्य आजमावित आहेत. तर दिंडोरी मतदारसंघातून राष्टÑवादीकडून धनराज महाले, भाजपाच्या डॉ. भारती पवार, माकपाचे जिवा पांडू गावित, बहुजन वंचित आघाडीचे बापू बर्डे, अपक्ष अशोक जाधव, दादासाहेब पवार, दत्तू बर्डे, टी. के. बागुल हे आठ उमेदवार नशीब आजमावित आहेत. निवडणुकीची घोषणा झाल्यापासून सर्वच उमेदवारांनी प्रचाराला सुरुवात केली होती. प्रमुख राजकीय पक्षांनी आपापल्या उमेदवारांच्या प्रचारासाठी जिवाचे रान केले. राष्टÑीय व राज्यस्तरीय स्टार प्रचारकांच्या जाहीरसभा, आरोप-प्रत्यारोपाच्या फैरीने जिल्ह्यात राजकीय वातावरण तप्त झाले होते. शनिवारी सायंकाळी सहा वाजता जाहीर प्रचाराची सांगता करण्यात आली. त्यानंतर उमेदवार गेल्या दोन दिवसांपासून राजकीय डावपेच, व्यूहरचना आखण्यात दंग होते.
प्रशासकीय यंत्रणा सज्ज
सोमवारी सकाळी सात ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत जिल्ह्यातील ४७२० मतदान केंद्रांवर मतदान घेण्यात येणार असून, नाशिक जिल्ह्यात ४५ लाख ०५ हजार ३२० मतदार आहेत. त्यात २३ लाख ५८ हजार ६६० पुरुष व २१ लाख ४६ हजार ५६८ महिला मतदारांची संख्या असून, ९२ तृतीयपंथी मतदार आपला हक्क बजावतील. एका मतदान केंद्रावर १४०० पेक्षा कमी मतदार मतदान करू शकतील, अशी व्यवस्था करण्यात आली आहे. त्यासाठी २४,७२३ कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असून, जिल्ह्यातील मतदान केंद्रासाठी ५५१३ बॅलेट युनिट व कंट्रोल युनिट तसेच ५९६९ व्हीव्हीपॅट यंत्रे सज्ज ठेवण्यात आली आहेत.