भाजपाच्या आजच्या भूमिकेने समीकरणे ठरणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2018 01:05 AM2018-05-20T01:05:35+5:302018-05-20T01:06:13+5:30
विधान परिषदेच्या नाशिक स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या मतदानासाठी २४ तासांचा कालावधी शिल्लक असतानाही भारतीय जनता पक्षाने आपली भूमिका गुलदस्त्यात ठेवत या निवडणुकीची उत्सुकता वाढविली असली तरी भाजपाच्या छुप्या पाठिंब्याने या निवडणुकीत उमेदवारी करणारे जिल्हा विकास आघाडीचे परवेज कोकणी समर्थक भाजपाच्या या भूमिकेने नाराज झाले आहेत.
नाशिक : विधान परिषदेच्या नाशिक स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या मतदानासाठी २४ तासांचा कालावधी शिल्लक असतानाही भारतीय जनता पक्षाने आपली भूमिका गुलदस्त्यात ठेवत या निवडणुकीची उत्सुकता वाढविली असली तरी भाजपाच्या छुप्या पाठिंब्याने या निवडणुकीत उमेदवारी करणारे जिल्हा विकास आघाडीचे परवेज कोकणी समर्थक भाजपाच्या या भूमिकेने नाराज झाले आहेत. खुद्द भाजपाच्या मतदारांमध्ये निर्माण झालेल्या संभ्रमामुळे पक्ष नेतृत्वावर येत असलेल्या दबावापोटी आता रविवारी सायंकाळी सहा वाजता पक्षाकडून अधिकृत भूमिका जाहीर करण्यात येणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीची प्रशासकीय पातळीवर एकीकडे तयारी करीत असताना दुसरीकडे राजकीय पातळीवर हालचालीही गतिमान झाल्या असून, शनिवारी दुपारी कॉँग्रेस आघाडीचे सदस्य अज्ञातस्थळी रवाना करण्यात आले आहेत तर शिवसेनेचे सदस्य अजूनही सहलीसाठी बाहेरगावीच आहेत. मात्र भाजपाने अद्यापही या निवडणुकीत कोणतीच भूमिका न घेतल्याने मित्रपक्ष शिवसेना अडचणीत सापडली आहे. अखेरच्या क्षणी भाजपा आपल्याला पाठिंबा देईल, अशी आशा शिवसेना बाळगून असताना दुसरीकडे भाजपाच्या छुप्या पाठिंब्यावर उमेदवारी करणारे जिल्हा विकास आघाडीचे परवेज कोकणी यांनादेखील भाजपाने अखेरच्या क्षणापर्यंत प्रतीक्षेत ठेवले आहे. पाच दिवसांपूर्वी मुख्यमंत्र्यांनी सर्व भाजप मतदारांना मुंबईत बोलावून निर्णय जाहीर करण्यासारखे वातावरण निर्माण केले, परंतु त्या बैठकीतही कोणताच निर्णय झाला नाही त्यामुळे मतदानाला २४ तास शिल्लक असताना भाजप काय भूमिका घेते याकडे शिवसेनेसह राष्टÑवादी व जिल्हा विकास आघाडीचे लक्ष लागले आहे. भाजपाच्या नगरसेवकांमध्येदेखील याबाबत संभ्रम निर्माण झालेला असून, नेमके मतदान कोणाला करावे, असा प्रश्न त्यांच्या समोर पडला आहे. या पार्श्वभूमीवर शनिवारी भाजपाचे शहराध्यक्ष बाळासाहेब सानप यांनी पत्रकारांशी बोलताना रविवारी सायंकाळी सहा वाजता पालकमंत्री गिरीश महाजन व संघटनमंत्री किशोर काळकर यांच्या उपस्थितीत भाजपाच्या मतदारांची बैठक होणार असून, या बैठकीत पक्षाची अधिकृत भूमिका जाहीर करण्यात येणार असल्याचे सांगितले. भाजपाने अद्यापही कोणाला पाठिंबा दिलेला नाही, हे स्पष्ट करताना भाजपाच्या नावे अनेक अफवा उठविण्यात आल्या असून, त्यावर कोणीही विश्वास ठेवू नये हे सांगण्यासही सानप विसरले नाही. त्यामुळे रविवारी भाजप काय भूमिका जाहीर करते याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.