शिक्षक मतदारसंघासाठी आज मतदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2018 01:01 AM2018-06-25T01:01:39+5:302018-06-25T01:01:55+5:30
नाशिक : नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघासाठी सोमवारी (दि.२५) मतदान होणार असून, निवडणुकीसाठी मतदान यंत्रणा सज्ज झाली आहे. जिल्हा प्रशासनाकडून रविवारी मतदान केंद्रांवर साहित्य पाठविण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. दरम्यान, रविवारची संधी साधत उमेदवार आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी मतदारसंघ पिंजून काढत मतदारांच्या प्रत्यक्ष भेटी घेतल्या. या निवडणुकीत १६ उमेदवार नशीब आजमावित असून चौरंगी लढतीची शक्यता वर्तविली जात आहे. नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघासाठी १६ उमेदवार रिंगणात असले तरी चौरंगी लढतीची शक्यता वर्तविली जात आहे. एकूण १६ उमेदवार निवडणुकीत नशीब आजमावत असून, पाचही जिल्ह्णांत ९४ मतदान केंद्रांवर मतदान होणार आहे. सकाळी सात ते सायंकाळी पाच या कालावधीत मतदान होणार आहे. पाचही जिल्ह्णात एकूण ५३,३३५ इतके मतदार आहेत. त्यामध्ये ४०,४१२ पुरुष तर १२ ९२३ स्त्री मतदार आहेत. नाशिक शहरात एकूण २५ मतदान केंद्रे आहेत.
शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी राजकीय प्रतिष्ठा पणाला लागल्याने पक्षांचे आजी-माजी पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधी कामाला लागले आहेत. अंतिम टप्प्यात सोशल मीडियाच्या माध्यमाचा वापर करण्यात आला. मतदारसंघ मोठा असल्याने मतदारांपर्यंत पोहचण्यासाठी उमेदारांची कसरत होत आहे. चारही जिल्ह्यांत कार्यकर्त्यांच्या जोरावर प्रचार करावा लागत आहे. शहरातील २५ मतदान केंद्रांवर तयारी पूर्ण करण्यात आली आहे.