माघी पौर्णिमेनिमित्त आज यात्रोत्सव

By admin | Published: February 10, 2017 12:11 AM2017-02-10T00:11:14+5:302017-02-10T00:11:24+5:30

ग्रामदैवत : नगरसूलला पुरणपोळीचा नैवेद्य, चांदवडला खंडोबा मंदिंरात पूजन

Today's Yogotavsav for Maghi Purnima | माघी पौर्णिमेनिमित्त आज यात्रोत्सव

माघी पौर्णिमेनिमित्त आज यात्रोत्सव

Next

 नगरसूल : येथील ग्रामदैवत व महाराष्ट्राचे कुलदैवत खंडेराव महाराज यांची शुक्रवारी माघ पौर्णिमेला (दांडी पौर्णिमा) यात्रोत्सव साजरा होत आहे. यानिमित्त सालाबादप्रमाणे बारागाड्या ओढण्याचा कार्यक्र म होत असून, यावर्षी या गाड्या ओढण्याचा मान मंगेश नागरे, महेश पाटील, बाळू सुरासे व विलास निकम यांना मिळाला आहे.
या यात्रेला आठ दिवस अगोदरच सुरुवात होत असते. दररोज रात्री ८ वाजता खंडोबाभक्त वसंत शितोळे यांच्या घरापासून डफ, पिपाणीच्या सुरात चौकाचौकात सामुदायिक नृत्याची व वाजविण्याची तयारी होत असते. हे सात दिवस दररोज नित्यनियमाने होत असते. यात्रेच्या दिवशी बारागाड्या ओढण्याचा कार्यक्र म संध्याकाळी सूर्यास्तादरम्यान होतो. यात्रेच्या पहिल्या रात्री १२ वाजेला तेलवन पाडण्यासाठी नगरसूलचे भगत बारागाड्याचे मानकरी खंडू महाले, वसंत शितोळे, गणुबाबा तेली, यशवंत कुडके, इंदुरेबाबा, नवनाथबाबा, अशोक सानप, रघुनाथ भडके, आनंदा भडके, भडके भगत यांसह पंचक्र ोशीतील वाघे मंडळी हजर राहतात.
दुसऱ्या दिवशी सकाळी गंगेच्या पाण्यानी भरलेल्या कावड्या व खंडेराव महाराज मुखवट्याची पालखी मिरवणूक निघते. नंतर मंदिरात खंडोबामूर्तीवर जलाभिषेक करून व मूर्तीला चांदीचा मुखवटा घालून अभिषेक केला जातो. दुपारनंतर चार वाजेला नवसकरी चारही नवरदेवांना भगत मंडळी गावाच्या दक्षिणेस वेताळबाबा मंदिरासमोर नेऊन नियोजित जागेवर त्यांना गळ टोचण्याचा कार्यक्रम होतो.
गळ धरण्याचा मान सुतार समाजाला असून, त्यात कैलास पेंढारी,आप्पा बोराडे, नारायण सुतार, राजू पेंढारी यांचा समावेश आहे. हे नवरदेव संपूर्ण गावातून मिरवून आल्यानंतर कुडके गल्लीत गणेश चौकात घुमाऱ्याची हजेरी घेऊन त्यांना कापूर भंडारा देऊन, लंगर किंवा साढाने फुले देतात. हे सर्व घुमारे बारागाड्यांपुढे नाचत असतात.
आकाशाला गवसणी घालणाऱ्या उंच उंच काठ्या नाचवतात. बारागाड्यांपुढे वाघ्या मुरळी नाचत असतात. त्यावेळी भाविक भंडाऱ्याची मोठी उधळण करीत असतात. बारागाड्यांवर गाड्यांचे मानकरी, चारही नवरदेव गाड्यांना जुपल्यावर मानाची उंच पताका गाड्यावर टेकवून वर केल्यावर खंडू तेलीबाबा हात वर करताच गाड्या ओढतात. रात्री लोकनाट्य व दुसऱ्या दिवशी कुस्त्यांची दंगल होते. यावेळी नामांकित पहिलवानांची हजेरी होते.
चांदवडला बारागाड्या
चांदवड : येथील राजमंदिर खंडोबा देवस्थान येथे माघी पौर्णिमेनिमित्त यात्रोत्सवास प्रारंभ झाल्याची माहिती अध्यक्ष पप्पू भालेराव, उपाध्यक्ष दत्ता कोतवाल, सचिन अग्रवाल व पंचकमिटीने दिली. यानिमित्त सोमवारी (दि. ६) ट्रस्ट संस्थापक माजी आमदार शिरीषकुमार कोतवाल व मीनाताई कोतवाल यांच्या हस्ते घटस्थापना झाली, तर अशोक (दिंडोरी), रंगनाथ देशमाने (शिरवाडे वणी), मधुकर जाधव (पिंपळगाव बसवंत), रवींद्र चव्हाण (नाशिक) या वाघे मंडळीचा कार्यक्रम झाला.
शुक्रवारी (दि. १०) माघी पौर्णिमेच्या दिवशी सकाळी ९ वाजता हनुमान मंदिरापासून कावडी रथाची मिरवणूक होईल. रथाचे मानकरी दत्ता बाजीराव कोतवाल हे असतील. सायंकाळी ६ वाजता बारागाड्या ओढण्याचा कार्यक्रम रमेश वामनराव पवार यांच्या हस्ते होईल. मिश्रीलाल अग्रवाल परिवाराच्या वतीने ७ वाजता महाप्रसादाचा कार्यक्रम होईल, तर रात्री ९ वाजता पुजारी निवृत्तीअण्णा जेऊघाले, ताईबाई मुरळी, वामनराव बरकले, समाधान बागल, कैलास अहेरराव, पप्पू अहेरराव (रायपूर बेट) यांचा लंगर जागरणाचा कार्यक्रम होईल. यात्रोत्सवाचा लाभ घेण्याचे आवाहन खंडेराव महाराज यात्रोत्सव कमिटीने केले आहे. (वार्ताहर)

Web Title: Today's Yogotavsav for Maghi Purnima

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.