‘मनसे’तील गटबाजीवर निघणार ‘राज’तोडगा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2021 04:17 AM2021-07-14T04:17:53+5:302021-07-14T04:17:53+5:30
नाशिक महापालिकेत सत्ता असतानाही जी गटबाजी फोफावली होती, त्यातील बऱ्यापैकी नेते आता पक्षात नाहीत. मात्र, आता पक्षात वेगळेचे दोन ...
नाशिक महापालिकेत सत्ता असतानाही जी गटबाजी फोफावली होती, त्यातील बऱ्यापैकी नेते आता पक्षात नाहीत. मात्र, आता पक्षात वेगळेचे दोन गट तयार झाले आहेत. त्याचा फटकादेखील पक्षाला बसत आहे. पक्षांतर्गत गटबाजीमुळे पक्षाला ठोस दिशा नाही की संघटनात्मक कार्यक्रम नाही अशी अवस्था आहे. त्यामुळे काही तरुण तुर्क मध्यंतरी राज ठाकरे यांना कृष्णकुंजवर भेटून आले. त्यानंतर राज ठाकरेदेखील नाशिक दौऱ्यावर येऊन गेले. गटबाजीमुळे पक्षातील सामान्य आणि जुने कार्यकर्ते इतके अस्वस्थ आहेत की पंधरा प्रमुख पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी राजीनामा देण्याची तयारी केली होती. त्यांना पक्षाने थोपवले असले तरी नंतर गटबाजी कमी झालेली नाही. मध्यंतरी पक्षाच्या पाच प्रमुख नेते आणि कार्यकर्त्यांना राज यांनी मुंबईत पाचारण केले. नंतर मात्र नेते अर्ध्या मार्गावर असताना राज यांना वेळ नसल्याने संबंधितांना माघारी फिरण्यास सांगण्यात आले. त्यानंतर पक्षाच्या एका नेत्याने डिनर डिप्लोमसीचा प्रयत्न केला. परंतु, उपयाेग झालेला नाही. पक्षाच्या माजी महापौरांना राजगडाच्या वर्धापनदिनाला निमंत्रण देण्यात आले नव्हते, असेही सांगण्यात आले. त्यामुळे माजी महापौरांनी आता राजगडवर येणारच नसल्याचा त्यावेळी सांगावाही धाडला होता.
महापालिकेच्या निवडणुका तोंडावर असताना पक्षातील बेकी मात्र जोर धरू लागली आहे. मोजकेच नेते असतानाही त्यांच्यातील मतभेद मात्र पक्षाला अडचणीचे ठरू लागले आहेत. अशीच स्थिती राहिली तर पक्षाचे भवितव्य काय, असाही प्रश्न कार्यकर्ते करत असून राज ठाकरे यांनी या दौऱ्यात गटबाजीवर तोडगा काढावा, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
इन्फो...
ॲम्बेसिडरची नुसतीच घोषणा, कार्यवाही नाही!
मुंबईत मनसेच्या गटप्रमुखांना असलेले स्थान नाशिकला मिळावे आणि त्यांना कामे करण्यासाठी ऊर्जा मिळावी यासाठी राज ठाकरे यांनी यापूर्वीच्या भेटीत ॲम्बेसिडर नियुक्त करण्याची सूचना केली होती. पक्षाचे नेते वसंत फडके आणि मुंबईहून काही मार्गदर्शक पाठवून त्यासंदर्भात कार्यवाहीचे मार्गदर्शन करणार होते. मात्र, ही घोषणा हवेत विरली आहे.