शौचालय बांधकामाची पाहणी
By Admin | Published: February 16, 2017 10:53 PM2017-02-16T22:53:24+5:302017-02-16T22:53:38+5:30
गेटस् फाउंडेशन : अमेरिकन पाहुण्यांचा सिन्नरला फेरफटका
सिन्नर : स्वच्छ भारत अभियानांतर्गत सिन्नर शहरात सुरू असलेल्या शौचालय बांधकामांची अमेरिकेतील बिल अॅण्ड मेलिंडा गेट्स फाउंडेशनच्या अधिकाऱ्यांनी पाहणी केली. स्वच्छ भारत अभियानातून उभे केलेले काम आणि भविष्यासाठीचे नियोजन याबद्दल अमेरिकन पाहुण्यांनी सिन्नर नगरपालिकेचे कौतुक केले.
गेट्स फाउंडेशनचे चार अधिकारी व सीईपीटी विद्यापीठाच्या पीएएस प्रकल्पाचे आसिम मन्सुरी, धु्रव भावसार, ओंकार काणे हे गुरुवारी सकाळी दहा वाजता सिन्नर नगरपालिका कार्यालयात दाखल झाले. मुख्याधिकारी व्यंकटेश दुर्वास, नगराध्यक्ष किरण डगळे, उपनगराध्यक्ष प्रमोद चोथवे, आरोग्य निरीक्षक रवि देशमुख यांच्यासह नगरसेवकांशी त्यांनी चर्चा केली. यावेळी मन्सुरी यांनी सिन्नर नगरपालिकेने स्वच्छ भारत अभियानात आत्तापर्यंत केलेल्या कामाची पॉवर पॉर्इंट प्रेझेंटेशनद्वारे माहिती दिली.
नगरपालिका हद्दीत स्वच्छ भारत अभियानांतर्गत प्राप्त झालेल्या अनुदानातून ९३५ लाभार्थींनी शौचालयाचे काम पूर्ण केले असून, १५० नवीन शौचालयांचे बांधकाम सुरू आहे. गेट्स फाउंडेशनच्या अधिकाऱ्यांनी आंबेडकरनगर, गोंदेश्वर मंदिरासह शहरातील अनेक भागात अधिकाऱ्यांनी सुरू असलेल्या शौचालयाच्या कामाची भेट देऊन पाहणी केली.
स्वच्छ भारत अभियानाची जनजागृती करण्यासाठी शहरात ठिकठिकाणी लावलेले फलक, घनकचरा व्यवस्थापन, फिरती शौचालये या कामांसह भविष्यासाठी केलेले नियोजन याबाबत गेट्स फाउंडेशनच्या अधिकाऱ्यांनी समाधान व्यक्त केले. (वार्ताहर)