लाभार्थ्यांकडून शौचालयांची मागणी
By admin | Published: May 8, 2017 01:40 AM2017-05-08T01:40:39+5:302017-05-08T01:40:58+5:30
नाशिक : नव्याने केलेल्या सर्वेक्षणात आणखी ४६९४ लाभार्थ्यांनी शौचालयांची मागणी केली असल्याची माहिती महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त किशोर बोर्डे यांनी दिली
लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत अभियानांतर्गत महापालिकेने शहरात पहिल्या टप्प्यात ६४४६ लाभार्थ्यांना वैयक्तिक शौचालयांचा लाभ पुरविल्यानंतर एप्रिल महिन्यात पुन्हा नव्याने केलेल्या सर्वेक्षणात आणखी ४६९४ लाभार्थ्यांनी शौचालयांची मागणी केली असल्याची माहिती महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त किशोर बोर्डे यांनी दिली. दरम्यान, महापालिकेकडे सदर अभियानांतर्गत मिळालेल्या अनुदानातील तीन कोटी ३८ लाख रुपयांचा निधी शिल्लक असून, त्यातून नवीन लाभार्थ्यांना पहिल्या हप्त्याचे वाटप करण्याचा विचार असल्याचेही बोर्डे यांनी स्पष्ट केले.
केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत अभियानांतर्गत महापालिकेने आतापर्यंत ६४४६ वैयक्तिक शौचालयांची उभारणी केलेली आहे. महापालिकेला स्वच्छ महाराष्ट्र अभियान (नागरी) राबविण्यासाठी आतापर्यंत दहा कोटी ४१ लाख ३९ हजार रुपयांचे अनुदान प्राप्त झाले आहे. प्राप्त अनुदानापैकी वैयक्तिक शौचालय लाभार्थ्याला ७ कोटी ८५ लाख ४ हजारांचा निधी वाटप झालेला आहे, तर ३ कोटी ३८ लाख १८ हजार रुपयांचा निधी शिल्लक आहे.
याशिवाय, वैयक्तिक शौचालयासाठी लाभार्थ्यांच्या खात्यावर दुसरा हप्ता १ कोटी ६० लाख ६२ हजार रुपये वर्ग करण्याची कार्यवाही सुरू आहे. आतापर्यंत महापालिकेने ६४४६ वैयक्तिक शौचालयांची उभारणी करत पहिल्या टप्प्यातील उद्दिष्ट पूर्ण केले आहे. शिलकी निधीतून आणखी काही शौचालयांची उभारणी करण्यासाठी महापालिकेने एप्रिल महिन्यात
सहाही विभागांत नव्याने सर्वेक्षण केले. त्यात ४६९४ लाभार्थ्यांनी
वैयक्तिक शौचालयांची मागणी केलेली आहे. त्यानुसार,
महापालिकेने कृती आराखडा तयार केला असून, सरकारकडून आणखी निधीची मागणी करण्यात आलेली असल्याचेही किशोर बोर्डे यांनी स्पष्ट केले.