शौचालयांचे अनुदान रखडले
By admin | Published: February 2, 2016 11:49 PM2016-02-02T23:49:44+5:302016-02-02T23:50:15+5:30
स्वच्छ भारत अभियान : ९७३ शौचालयांचे बांधकाम पूर्ण
नाशिक : केंद्र व राज्य सरकारमार्फत स्वच्छ भारत (नागरी) अभियानांतर्गत ६०७३ ठिकाणी शौचालय उभारणीचा कार्यक्रम महापालिकेच्या वतीने हाती घेण्यात आला असून, आतापर्यंत ९७३ शौचालयांचे बांधकाम पूर्ण झाले आहे, तर ८५५ शौचालयांचे बांधकाम सुरू आहे. महापालिकेने ४२१७ लाभार्थ्यांना निम्मे अनुदान अदा केले; परंतु पुढील अनुदान रखडल्याने शौचालय उभारणीच्या कार्यक्रमाला खीळ बसली आहे.
केंद्र व राज्य सरकारमार्फत स्वच्छ भारत (नागरी) अभियानअंतर्गत घरोघरी शौचालय उभारणीचा कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. त्यानुसार, नाशिक महापालिकेने सात महिन्यांपूर्वी शहरात सर्वेक्षण केले असता ५१ हजार ५८४ कुटुंबांच्या घरात शौचालयाची सुविधा उपलब्ध नसल्याचे निदर्शनास आले होते, तर ४४ हजार ६८० कुटुंबांकडून सार्वजनिक शौचालयांचा वापर होत असल्याचे समोर आले होते. ७१७४ कुटुंबे मात्र उघड्यावरच शौचविधी पार पाडत असल्याचे आढळून आले. त्यानुसार, महापालिकेने सदर ७१५४ कुटुंबांकडून शौचालय उभारणीसंबंधी अर्ज भरून घेतले होते. प्राप्त अर्जांची छाननी केल्यानंतर त्यातील ८७७ अर्ज तांत्रिक मुद्द्यांवरून बाद ठरविण्यात आले. एकूण ६०७३ लाभार्थ्यांना वैयक्तिक शौचालय बांधून दिले जाणार असून, त्यांना त्यासाठी प्रत्येकी १२ हजार रुपयांचे अनुदान अदा केले जाणार आहे. सध्या महापालिकेने प्रती लाभार्थ्यास सहा हजार रुपये अनुदानाचा पहिला हप्ता वितरित केला आहे. त्यानुसार आतापर्यंत ४२१७ लाभार्थ्यांना सुमारे २ कोटी ५३ लाख २ हजार रुपये अनुदान वाटप करण्यात आले आहे. सद्यस्थितीत शहरात ९७३ शौचालयांचे बांधकाम पूर्ण झाले असून, ८५५ शौचालयांचे काम सुरू आहे. महापालिकेने २ आॅक्टोबर २०१५ पासून स्वच्छ भारत अभियानांतर्गत शौचालय उभारणीला सुरुवात केली. सन २०१६ पर्यंत महापालिकेने सुमारे ३ हजार शौचालयांचे बांधकाम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट समोर ठेवले आहे. अद्याप उद्दिष्टाप्रमाणे ११७२ शौचालयांचे बांधकाम पूर्ण करण्याचे आव्हान महापालिकेसमोर आहे. महापालिकेने शौचालयांच्या बांधकाम प्रगतीचा अहवाल सादर करत आणखी अनुदानाच्या रकमेची मागणी शासनाकडे केली असून, अद्याप निधी वर्ग न झाल्याने कामकाजाला खीळ बसली आहे.