गैरसोय टाळण्यासाठी रुग्णांसाठी टोकन पद्धत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2020 02:01 AM2020-09-12T02:01:10+5:302020-09-12T02:01:54+5:30
शहरात कोरोनाबाधितांना खासगी रुग्णालयात उपचारासाठी येणाऱ्या अडचणी आणि बिले यासंदर्भातील तक्रारींवर मात करण्यासाठी महापालिकेने टोकन पद्धतीचा अवलंब करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे रुग्ण दाखल करण्यापासून ते बिल भरून डिस्चार्ज होईपर्यंत या टोकनच्या माध्यमातून ट्रॅकिंग करण्याचा निर्णय स्थायी समितीने बोलविलेल्या कोविड विशेष बैठकीत घेण्यात आला. यासंदर्भात सभापती गणेश गिते यांनी प्रशासनाला कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
नाशिक : शहरात कोरोनाबाधितांना खासगी रुग्णालयात उपचारासाठी येणाऱ्या अडचणी आणि बिले यासंदर्भातील तक्रारींवर मात करण्यासाठी महापालिकेने टोकन पद्धतीचा अवलंब करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे रुग्ण दाखल करण्यापासून ते बिल भरून डिस्चार्ज होईपर्यंत या टोकनच्या माध्यमातून ट्रॅकिंग करण्याचा निर्णय स्थायी समितीने बोलविलेल्या कोविड विशेष बैठकीत घेण्यात आला. यासंदर्भात सभापती गणेश गिते यांनी प्रशासनाला कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
गेल्या मंगळवारी (दि. ८) स्थायी समितीच्या बैठकीत सदस्यांन कोरोना विषयक तक्रारी करताना सर्वसामान्य नागरिकांचे हाल होत असल्याचे निदर्शनास आणले होते. मात्र, यासंदर्भात शुक्रवारी (दि. ११) सभापतींनी विशेष सभा घेण्याचे जाहीर केले होते. त्यानुसार ही सभा पार पडली. यावेळी सर्वसामान्य रुग्णांवर उपचार करताना त्यावर महापालिकेचे नियंत्रण राहावे यासाठी टोकन पद्धत सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. महापालिका रुग्णालयातून खासगी रु ग्णालयात रुग्ण भरती होत असताना त्याला टोकन देण्यात येणार असून, त्यानंतर त्याच्या डिस्चार्जपर्यंतचे रेकॉर्ड ट्रॅक करण्यात येणार आहे. यावेळी रुग्णांची संख्या वाढत असताना शहरात उपचार व्यवस्था पुरेशी नाही. शहरात पुरेशे बेड नाही, त्यातच आॅक्सिजनदेखील कमी पडत आहे, मनपाने आॅडिटर नियुक्त करून बिलांत फरक पडलेला नाही. नगरसेवक फोन करूनदेखील रुग्णांना बेड मिळत नसल्याच्या तक्रारी करण्यात आल्या. यावर सर्वसामान्य नागरिकांना दिलासा देण्याची मागणी, सत्यभामा गाडेकर, सुधाकर बडगुजर, राहुल दिवे, समिना मेमन, कमलेश बोडके, प्रा. शरद मोरे यांनी केली. महापालिकेच्या बिटको रुग्णालयात रुग्णसंख्या वाढत असताना पुरेसा आॅक्सिजन साठा उपलब्ध नसल्याने सदस्यांनी वैद्यकीय विभागाला धारेवर धरले. प्रशासनाने याठिकाणी कोणतेही नियोजन केले नसल्याची तक्रार करतानाच त्यामुळे आॅक्सिजनची कमतरता लक्षात घेता येत्या तीन महिन्यांत महापालिकेने बिटको रु ग्णालयात स्वमालकीचा आॅक्सिजन प्लान्ट उभारण्याची आग्रही मागणी करण्यात आली. कोरोनाशी लढताना अनेक कर्मचाऱ्यांना संसर्ग होत असल्याने स्थायी समितीने कर्मचाºयांचा पाच लाख रुपयांचा वैद्यकीय विमा व टर्म पॉलिसी काढण्याचा निर्णय घेतला. स्वाती भामरे, रोकेश दोंदे, सुनीता कोठुळे, कल्पना पांडे, सुप्रिया खोडे, हेमंत शेट्टी यांनी चर्चेत भाग घेतला. बैठकीत अतिरिक्त आयुक्त डॉ. प्रवीण आष्टीकर व वैद्यकीय अधीक्षक डॉ. बापूसाहेब नागरगोजे यांनी मनपाच्या कार्यवाहीची माहिती दिली.
...तर रुग्णालयांची नोंदणीच रद्द करणार
खासगी रुग्णालयांमध्ये अवास्तव बिले आकारली जात असून, त्यासंदर्भात महापालिकेने नियुक्तकेलेले लेखा परीक्षक कुचकामी ठरल्याचा आरोप खुद्द सभापती गणेश गिते यांनी केला, त्यावर खासगी रुग्णालयांनी जादा बिले आकारल्यास त्यांची नोंदणी रद्द करण्याच्या सूचना गिते यांनी दिल्या आहेत. मनपाच्या लेखा परीक्षकांना बिलांसंदर्भातील कागदे उपलब्ध करून दिली जात नाहीत, अशीच स्थिती सुरू राहिली तर लोकच मनपावर चालून येतील, असा इशारा गिते यांनी दिला आहे.
मनपाचे लवकरच वैद्यकीय महाविद्यालय
कोरोनाशी लढताना मनपाकडे पुरेसे वैद्यकीय अधिकारी उपलब्ध होत नसल्याचे प्रकर्षाने जाणवत आहे. त्यामुळे कोरोनाचा विषय मागे पडल्यानंतर लवकरच महापालिकेच्या मालकीचे वैद्यकीय महाविद्यालय सरू करण्यात येणार आहे. स्थायी समितीने यासंदर्भात सूचना केली आहे.