देवीभक्तांकडून दहा रुपयांचा वाहनतळ ‘टोल’
By admin | Published: December 15, 2015 10:55 PM2015-12-15T22:55:45+5:302015-12-15T22:57:43+5:30
सीईओंचे आदेश : ग्रामपंचायतीकडून मागविला अहवाल
नाशिक : येवला तालुक्यातील कोटमगावच्या देवीच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांच्या वाहनांना सरसकट दहा रुपयांचा वाहनतळ ‘कर’ आकारणाऱ्या कोटमगाव ग्रामपंचायतीकडून यासंदर्भात अहवाल मागविण्याचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिले आहेत.
कोटमगाव ग्रामपंचायतीने गेल्या दोन आठवड्यांपासून कोटमगाव देवीच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांच्या वाहनांसाठी दहा रुपये वाहनतळ कर आकारणी करण्याचा निर्णय घेतला आहे. वस्तुत: असा निर्णय घेण्याआधी संबंधित ग्रामपंचायतीने जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीची मान्यता घेणे कायद्याने बंधनकारक आहे. मात्र कोटमगाव ग्रामपंचायतीने परवानगी न घेताच ही दहा रुपये कर आकारणी सुरू केल्यानंतर त्याच्या तक्रारी जिल्हा परिषदेकडे आल्या. मंगळवारी (दि.१५) यासंदर्भात मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद शंभरकर यांनी ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी रणधीर सोमवंशी यांना बोलावून संबंधित ग्रामपंचायतीने याबाबत नेमकी काय कार्यवाही केली आहे? याबाबतचा तातडीने अहवाल मागवावा, असे आदेश दिले. जिल्हा परिषद सदस्य कृष्णराव उर्फ बाळासाहेब गुंड यांनी संबंधित ग्रामपंचायतीने अशी कर आकारणी केली होती, मात्र आता ही कर आकारणी बंद करण्यात आल्याचे सांगितले. विशेष म्हणजे मागील दोन स्थायी समिती सभांमधून सप्तशृंग गड ग्रामपंचायतीने येणाऱ्या भाविकांवर आधी सरसकट दोन रुपये व नंतर ही दरवाढ फेटाळल्यानंतर येणाऱ्या भाविकांच्या वाहनावर १५ ते २० रुपये कर आकारणीचा प्रस्ताव सादर केल्यानंतर तो फेटाळण्यात आला आहे. दुसरीकडे जिल्हा परिषदेची मान्यता न घेताच सरसकट वाहनतळाची कर आकारणी करणाऱ्या ग्रामपंचायतीवर आता कोणती कारवाई करते, याकडे जिल्हा परिषद सदस्यांचे लक्ष लागले आहे.
(प्रतिनिधी)