...अन् शेवंताबार्इंच्या शेतात फुलला टमाटा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2018 04:11 PM2018-12-17T16:11:17+5:302018-12-17T16:11:24+5:30
रोहयोतून सिंचन विहीर : करंभेळच्या दाम्पत्याला दिलासा
कळवण : तालुक्यातील दुर्गम असलेल्या करंभेळ गावातील शेवंताबार्इं बागूल यांना महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेअंतर्गत सिंचन विहीर बांधून मिळाल्याने त्यांच्या कोरडवाहू शेतात टमाटयाचे पीक उभे राहिले आहे. मोलमजुरी करुन कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या बागूल दाम्पत्याचे त्यामुळे जगणे सुकर बनण्यास मदत झाली आहे.
शेवंताबाई बागुल आणि त्यांचे पती हिरामण बागुल शेतमजूरी करून वर्षानुवर्ष कुटुंबाचा गाडा हाकत आहेत. दोन मुले कष्टाने मोठी केली. आपल्या दोन एकर शेतात पाणी असेल तेवढे मका-सोयाबीनचे उत्पन्न घ्यायचे आणि कुटुंबापुरता दाणा साचवायचा एवढेच त्यांना माहीत होते. इतर खर्चासाठी मजूरीवर अवलंबून रहावे लागे. यावर्षी ग्रामपंचायतीतून सिंचन विहीरीची माहिती त्यांना मिळाली आणि विहिरीसाठी अनुदान ही मिळाले. त्यांना जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष सौ जयश्री पवार , कळवण पंचायत समितीचे गटविकास अधिकारी डी.एम. बिहरम आणि मनरेगा कक्षाचेसहकार्य मिळाले. स्वत: अकुशल काम केल्याने ७१ हजार आणि कुशल कामासाठी ८५ हजार अनुदान त्यांना रोहयोअंतर्गत मिळाले. विहिरीवर इलेक्ट्रीक मोटार आणि पाईप बसवून मिळाला. त्याचे २६ हजार वेगळे अनुदान मिळाले. विहिरीला चांगले पाणीदेखील लागले आहे. शेतासाठी पाणी उपलब्ध झाल्याने शेतात प्रथम टमाट्याचे पीक उभे राहिले आहे. याशिवाय कांदा आणि गाजर देखील काही प्रमाणात लावले आहे.
मजूरीसाठीबाहेर जावे लागणार नाही
मजूरी करताना विहिरीसाठी पैसे उभारणे अशक्य होते. शासनाच्या योजनेमुळे आता मजूरीसाठीबाहेर जावे लागणार नाही, किमान प्रमाण तरी कमी होईल यांचे समाधान आहे. आता स्वत:च्या शेतात कष्ट करून उदरिनर्वाह करता येईल याचा आनंद आहे.
- शेवंताबाई बागूल